प्रेमासाठी मुस्लिम धर्मातून हिंदू धर्मात प्रवेश केला, आता मिळताहेत धमक्या

गोमंतक ऑनलाईन टीम
मंगळवार, 1 डिसेंबर 2020

एका मुस्लिम युवकाने आपल्या हिंदू प्रेमिकेशी लग्न करण्यासाठी आपला धर्मच परावर्तित केला. 

हरियाणा-  कथित 'लव जिहाद'बद्दल देशातील वातावरण चांगलेच तापले आहे. अनेक राज्यांमध्ये यावर कायदा आणण्याची तयारीही सुरू आहे. उत्तर प्रदेशमध्ये तर हा कायदा जबरदस्तीने अंमलातही आणला गेला आहे. हरियाणा सरकारही अशा पद्धतीने कायदा करण्याच्या मानसिकतेत आहे. अशातच एका मुस्लिम युवकाने आपल्या हिंदू प्रेमिकेशी लग्न करण्यासाठी आपला धर्मच परावर्तित केला. 

काय आहे प्रकरण? 
हरियाणामधील यमुनानगर जिल्ह्यातील 21 वर्षीय तरूण 19 वर्षीय तरूणीची ओळख झाली. दोघांमध्ये मैत्री झाली. त्यानंतर ही त्याचं रूपांतर प्रेमात होऊन ही गोष्ट लग्नापर्यंत गेली. मात्र, लग्नासाठी मुळ अडचण म्हणजे दोघांचे धर्म निरनिराळे होते. तरूणाच्या घरचे या नात्याबाबत आनंदी असल्याचे खुद्द तो तरूणच म्हणतो. संबंधित तरूण एका खासगी कंपनीत काम करतो. जवळपास 15 हजार रूपये त्याचा महिन्याचा पगार आहे. 9 नोव्हेंबरला दोघांनी तरूणीच्या कुंटुंबियांच्या विरोधात जाऊन लग्न करून घेतले. हे लग्न मंदिरात लागले. याआधीच या मुस्लिम मुलाने लग्नाआधीच आपले नावही बदलले. लग्नही पूर्ण हिंदू पद्धतीने लावण्यात आले.  

लग्नानंतर मात्र आता या जोडप्याने सुरक्षेसाठी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. दोघांनी आपल्या जीवाला धोका असल्याचे न्यायालयाला सांगितले आहे. लग्न झाल्यापासून तरूणीच्या परिवाराकडून त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. याआधी मुलीच्या घरच्यांनी मुलाविरोधात पळवून नेल्याचा गुन्हाही दाखल केला आहे. संविधानातील अनुच्छेद 21 नुसार आम्हाला प्राप्त झालेल्या अधिकारांचे रक्षण करावे, अशी याचना या जोडप्याने केली आहे.    

न्यायालयाच्या आदेशानुसार संबंधित जोडप्याला सेफ हाऊसमध्ये हलवण्यात आले आहे. दोघांनाही काही दिवसांसाठी तॆथे राहण्यास सांगितले असून काही दिवसांनंतर दोघेही सेफ हाऊस सोडून आपला संसार पुन्हा सुरू करतील.

 

संबंधित बातम्या