'माय जीओव्ही कोरोना हेल्पडेस्क'चा दोन पुरस्कारांनी गौरव

PIB
बुधवार, 1 जुलै 2020

कोरोना साथरोगाशी आठवड्याचे सातही दिवस चोवीस तास सतत दोन हात करणारे आपले आरोग्य   कर्मचारी हेच या पुरस्काराचे खरे मानकरी आहेत, असे आम्हाला वाटते."   

नवी दिल्ली,

नुकत्याच संपन्न झालेल्या CogX 2020 या कार्यक्रमात, कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित 'माय जीओव्ही कोरोना हेल्पडेस्क' ने दोन श्रेणींमध्ये पुरस्कार पटकावले आहेत. 'कोविड-19 संदर्भात समाजासाठी सर्वोत्कृष्ट अभिनव संकल्पना' आणि 'कोविड-19 संदर्भातील सर्वांगीण विजेता म्हणून लोकप्रियतेच्या निकषावर निवड' या दोन श्रेणींमध्ये हे पुरस्कार माय जीओव्ही कोरोना हेल्पडेस्कने जिंकले आहेत. लंडनमध्ये झालेला CogX 2020 कार्यक्रम म्हणजे अत्यंत मानाची अशी जागतिक नेतृत्व शिखर परिषद आणि कृत्रिम बुद्धिमत्ता व उदयोन्मुख तंत्रज्ञानयुक्त प्रतिष्ठेचा वार्षिक महोत्सव, असे म्हणता येईल. माय जीओव्हीचा तांत्रिक भागीदार 'जिओहॅप्टीक टेक्नॉलॉजीज लिमिटेड'ने हे पुरस्कार जिंकले आहेत. 

मायजीओव्ही हा नागरिकांचा प्रत्यक्ष सहभाग मिळविणारा जगातील सर्वात मोठा मंच असून याद्वारे सरकार आणि नागरिक यादरम्यान दुतर्फा संवाद होऊ शकतो. जगातील सर्वात मोठी लोकशाही असणाऱ्या भारतात सहभागात्मक शासन अंमलात आणण्यातही त्याचा वाटा मोलाचा आहे. कोरोना प्रादुर्भावाचा सामना करण्यासाठी मायजीओव्ही, जिओहॅप्टीक टेक्नॉलॉजीज लिमिटेड आणि व्हाट्सअपच्या पथकाने एकत्रितपणे, केवळ पाच दिवसांच्या विक्रमी कालावधीत कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित असा मायजीओव्ही कोरोना हेल्पडेस्क विकसित केला.

मायजीओव्ही कोरोना हेल्पडेस्कने सार्वजनिक- खासगी भागीदारीचा (PPP चा) खरा आदर्श घालून दिला. यामध्ये मायजीओव्हीने नागरिक केंद्रित सेवा पुरविल्या. जिओहॅप्टीक टेक्नॉलॉजीज लिमिटेडने अद्ययावत तंत्रज्ञानाने युक्त अशा प्रकारच्या पायाभूत सेवा विकसित व कार्यान्वित केल्या तर सर्वसामान्य जनतेने सुचविलेल्या कल्पना दररोज समाविष्ट करून सेवा-सुविधांमध्ये सुधारणा केल्या गेल्या.

CogX हा कार्यक्रम लंडनमध्ये दरवर्षी आयोजित केला जाणारा असा जगातील एक सर्वात मोठा कार्यक्रम असून यात व्यापार-उदीम, शासन, उद्योग आणि संशोधन क्षेत्रातील 15,000 पेक्षा जास्त लोकांचा सहभाग असतो. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या तसेच उदयोन्मुख तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील सर्वोत्तम कामगिरीसाठी CogX पुरस्कार दिले जातात. कोरोना साथीच्या काळात समाजासाठी काम करणाऱ्या शेकडो तंत्रज्ञानात्मक स्पर्धकांमधून, काटेकोर मूल्यांकनानंतर पुरस्कारासाठी भारताच्या मायजीओव्ही कोरोना हेल्पडेस्कची निवड झाली. या साथरोगाच्या काळात लोकांचे जीवन सुरक्षित ठेवण्याच्या कामी साह्यभूत ठरल्याबद्दल जिओहॅप्टीक टेक्नॉलॉजीजला सन्मानित करण्यात आले. 

कोरोना प्रादुर्भावाच्या परिस्थितीत मायजीओव्ही कोरोना हेल्पडेस्कला 7 कोटी 60 लाखापेक्षा अधिक संदेश प्राप्त झाले व या हेल्पडेस्कने 4 कोटी 10 लाखापेक्षा अधिक संवादांवर प्रक्रिया केली. तीनही घटकांच्या सक्रिय सहभागामुळे या हेल्पडेस्कने 2 कोटी 80 लाखाहून अधिक भारतीयांना माहिती पुरवून सजग ठेवण्याचे काम केले आहे, वा करत आहे. तसेच कोरोनाबाबत अद्ययावत माहिती पुरवीत अफवा मोडीत काढणाऱ्या मंचाची जबाबदारीही सदर हेल्पडेस्कने पार पाडली आहे. 

"या साथरोगाचा सामना करण्यासाठी सुसंवादाची अचूक रणनीती आणि तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर ही गुरुकिल्ली आहे." असे प्रतिपादन मायजीओव्ही चे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.अभिषेक सिंग यांनी केले आहे. "डिजिटल इंडिया ने याची भक्कम पायाभरणी केली आहे. नागरिक आणि सरकार यांच्यातील सेतूचे काम करण्याचा प्रयत्न डिजिटल इंडिया व त्याचा उपक्रम असणाऱ्या मायजीओव्हीने केला. आणि नागरिकांच्या सहभागाची खबरदारी घेत त्यांच्या वापरातील मंचावरून माहिती प्रसारित केली जाऊ लागली. उद्दिष्टपूर्तीसाठी मायजीओव्ही कोरोना हेल्पडेस्कने जिओहॅप्टीक टेक्नॉलॉजीज व व्हाट्सअपसोबत भागीदारी केल्याने अधिकाधिक लोकांपर्यंत यशस्वीपणे माहिती पोहोचविता आली" असेही ते म्हणाले. वापरकर्त्यांना सोयीस्कर पद्धतीने त्यांचा सहभाग मिळवून कोविड -19 विषयी त्या-त्या व्यक्तीस उपयुक्त व आवश्यक अशी अद्ययावत माहिती यामध्ये पुरविली जाते. तसेच सरकारच्या मार्गदर्शक सूचना, वैद्यकीय तज्ज्ञांच्या सल्ला यांचाही त्यात समावेश असतो. कोरोनातून पूर्णपणे बऱ्या झालेल्या व्यक्तींच्या यशोगाथा, चुकीच्या माहितीचा/अफवांचा समाचार, याचाही अंतर्भाव यामध्ये असतो. वेळोवेळी रंजक मार्गांनी माहिती पुरविणारा आणि व्यक्तीला दिलासा देणारा हा हेल्पडेस्क, सध्याच्या संकटकाळात एका चांगल्या मित्राची भूमिकाही पार पाडतो.

पुरस्काराबद्दल बोलताना, हॅप्टीकचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सह-संस्थापक आकृत वैश म्हणाले, "योग्य माहिती पुरविण्याचा उपक्रम म्हणून सुरु झालेल्या या हेल्पडेस्कने आज, लाखो लोकांना मदत करणारा तंत्रज्ञानात्मक उपाय म्हणून जागतिक स्तरावर कीर्ती संपादन केली आहे. विक्रमी कालावधीत हे काम करण्यासाठी सरकारची मदत  अतिशय मोलाची ठरली. जागतिक परिषदेत सन्मानित झाल्यानंतर आता, 'समाजाला उपयोगी पडणे हेच तंत्रज्ञानाचे खरे काम' असण्याबद्दल आमचा विश्वास अधिक दृढ झाला आहे.

संबंधित बातम्या