देशावरील संकटे हे ढिसाळ धोरणांचा परिपाक

Dainik Gomantak
बुधवार, 24 जून 2020

व्हर्च्युअल बैठकीत काँग्रेसचा मोदी सरकारवर हल्लाबोल

नवी दिल्ली

कोरोना संकट, आर्थिक संकटापाठोपाठ सीमेवर ओढवलेल्या चिनी संकटाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने केंद्रातील मोदी सरकारचे अपयश देशासमोर मांडण्याची रणनिती आज कार्यकारिणीच्या बैठकीत आखली. ही संकटे मोदी सरकारच्या ढिसाळ धोरणांचाच परिणाम असल्याचा हल्लाबोल काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींनी यानिमित्ताने केला; तर शेजारी राष्ट्रांशी बिघडलेल्या संबंधांवरूनही केंद्र सरकारवर कठोर टीकास्त्र काँग्रेसने सोडले.
देशातील अंतर्गत; तसेच बाह्य सुरक्षेच्या मुद्द्यावर सोनिया गांधींच्या अध्यक्षतेखाली कार्यकारिणीची व्हर्चुअल बैठक आज झाली. यात माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग, राहुल गांधी यांच्यासह पक्षाचे वरिष्ठ नेते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी झाले होते. बैठकीनंतर केंद्र सरकारचे आर्थिक, सुरक्षा, आरोग्य या आघाड्यांवरील अपयश अधोरेखित करणारा ठरावही संमत करण्यात आला.

एकीकडे कोरोनासारख्या महामारीचा मुकाबला करताना भारत भयंकर आर्थिक संकटात सापडला आहे. अशात सीमेवर चिनी आक्रमणाचे नवे संकट उभे ठाकले आहे. चीनशी झालेला सीमावाद भाजप सरकारचे अव्यवस्थापन आणि चुकीचे धोरण यांचा परिपाक आहे.
सोनिया गांधी, अध्यक्षा, काँग्रेस

कोरोना संकटाला ज्या प्रकारे तोंड देणे आवश्यक होते, तसे प्रयत्न विद्यमान सरकारने केल्याचे दिसत नाही; तसेच सरहद्दीवरील संकटाचा खंबीरपणे मुकाबला झाला नाही, तर भविष्यात गंभीर परिस्थिती ओढवू शकते.
डॉ. मनमोहनसिंग, माजी पंतप्रधान

चीनने बेधडकपणे आपला भूभाग बळकावला असताना पंतप्रधानांनी घुसखोरी झालीच नसल्याचे म्हणत भारताची भूमिका दुबळी केली आणि जवानांचा विश्वासघात केला. भारतीय भूमीवर चिनी कब्जा कदापिही मान्य केला जाऊ शकणार नाही. चीनचे हे कृत्य आपल्या परराष्ट्र धोरणाचे सपशेल अपयश असून, पंतप्रधान मोदींनीच मुत्सद्देगिरी, राजनैतिक संवाद यंत्रणा उद्ध्वस्त केली आहे.
राहुल गांधी, काँग्रेस नेते

काँग्रेस कार्यकारिणीचे ठराव
- लाकडाउन काळात इंधन दरवाढ म्हणजे केंद्राची नफेखोरी
- इंधन दरवाढ मागे घेऊन सरकारने राजधर्माचे पालन करावे
- मनरेगाचे हमी दिवस १०० वरून २०० करावे
- प्रतिव्यक्ती पाच किलो अतिरिक्त मोफत अन्नधान्य वाटप सप्टेंबरपर्यंत करावे
- सीमेवर चिनी घुसखोरीबाबत सरकारची माहिती दिशाभूल करणारी आणि वस्तुस्थिती नाकारणारी
- पंतप्रधान, संरक्षणमंत्री, परराष्ट्रमंत्री आणि परराष्ट्र मंत्रालयाचे दावे परस्परविरोधी
- चिनी घुसखोरी नाकारणारे वक्तव्य पंतप्रधानांनी सर्वपक्षीय बैठकीत का केले
- चीनने आतापर्यंत भारतीय हद्दीत किती वेळा घुसखोरी केली

संबंधित बातम्या