काँग्रेसचे देशव्यापी आंदोलन

काँग्रेसचे देशव्यापी आंदोलन
Nationwide agitation from Congress

नवी दिल्ली : मोदी सरकारविरोधात काँग्रेसच्या देशव्यापी आंदोलनांना  आजपासून सुरुवात होणार आहे.  आज सरदार वल्लभभाई पटेल जयंती आणि इंदिरा गांधी पुण्यतिथीनिमित्त देशभरात किसान अधिकार दिवस पाळून केंद्राच्या नव्या कृषी कायद्यांना विरोध दर्शविला जाणार आहे. याअंतर्गत काँग्रेसतर्फे उद्या सर्व जिल्ह्यांमध्ये लाक्षणिक उपोषण केले जाईल.

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींनी १८ ऑक्टोबरला झालेल्या पक्ष सरचिटणीसांच्या बैठकीमध्ये केंद्र सरकारला रस्त्यावर उतरून विरोध करा ,असा आदेश दिला होता. त्यानंतर संघटना सरचिटणीस के. सी. वेणूगोपाल यांनी आंदोलनांचे वेळापत्रक जाहीर केले होते. यानुसार शेतकरी आणि कष्टकऱ्यांविरोधातील कायद्यांच्या निषेधार्थ उद्या (ता. ३१) सर्व जिल्ह्यांमध्ये लाक्षणिक उपोषण करून किसान अधिकार दिवस पाळला जाणार आहे.

यानंतर पुढील आठवड्यात पाच नोव्हेंबरला महिला आणि दलित अत्याचारविरोधी दिवस काँग्रेसतर्फे पाळला जाईल. उत्तर प्रदेशात हाथरसमध्ये दलित तरुणीवरील झालेल्या बलात्कार आणि हत्येच्या घटनेनंतर काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनी पीडितेच्या कुटुंबीयांना भेटण्याचा प्रयत्न केला असता उत्तर प्रदेश पोलिसांकडून झालेल्या विरोधामुळे काँग्रेसमधून संतप्त प्रतिक्रिया उमटली होती. त्यानंतर काँग्रेसकडून उत्तर प्रदेशातील कायदा सुव्यवस्थेवरून भाजपला सातत्याने लक्ष्य केले जात आहे. त्याअंतर्गत पाच नोव्हेंबरला सर्व राज्यांमध्ये निदर्शने करून महिला, दलितांवरील अत्याचारांना वाचा फोडण्याचे नियोजन काँग्रेसने केले आहे. यासोबतच, सार्वजनिक उद्योगांच्या विक्रीच्या सरकारी धोरणाविरोधात पाठिंबा मिळविण्यासाठी  ‘स्पिक अप फॉर पीएसयूज्‌’ ही ऑनलाइन मोहिम देखील राबविली जाणार आहे.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com