कोरोना: ‘अनलॉक -४’ चे नवे दिशा-निर्देश जारी

प्रतिनिधी
रविवार, 30 ऑगस्ट 2020

शाळा, महाविद्यालये बंदच; मेट्रो टप्प्याटप्प्याने धावणार

नवी दिल्ली: कोरोनाच्या संसर्गामुळे विविध सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय आणि धार्मिक कार्यक्रमांवर घालण्यात आलेली बंधने केंद्र सरकारने आज काहीशी शिथिल केली. आता या कार्यक्रमांना २१ सप्टेंबरपासून शंभर लोकांना उपस्थित राहता येईल. दिल्लीसह देशाच्या अन्य महानगरांतील मेट्रोची सेवाही येत्या ७ सप्टेंबरपासून टप्प्याटप्प्याने पुन्हा सुरू करण्याचे निर्देश गृह मंत्रालयाने दिले आहेत.

आज संध्याकाळी आठच्या सुमारास केंद्रीय गृहमंत्रालयाने ‘अनलॉक -४’ चे नवे दिशा-निर्देश जारी केले.  १ ते ३० सप्टेंबर या काळात शाळा, महाविद्यालये आणि शैक्षणिक संस्था मात्र बंदच राहणार आहेत. इयत्ता नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मात्र हे नियम काहीसे  शिथिल करण्यात आले आहेत. आता केंद्राच्या परवानगीशिवाय राज्यांना कंटेन्मेंट झोनच्याबाहेर लॉकडाउन लावता येणार नाही. कोरोनाच्या संसर्गामुळे  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वप्रथम २५ मार्च रोजी  लॉकडाउनची घोषणा केली होती त्यानंतर टप्प्याटप्प्याने  तो ३१ मेपर्यंत वाढविण्यात आला. आता १ जूनपासून देशामध्ये टप्प्याटप्प्याने अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली आहे. विविध सार्वजनिक कार्यक्रमांवरील बंधने सरकारने हळूहळू शिथिल करायला सुरुवात केली आहे. आता अनलॉकच्या चौथ्या टप्प्यामध्ये सार्वजनिक कार्यक्रमांवरील बंधने आणखी शिथिल करण्यात आली आहेत. सार्वजनिक कार्यक्रमांना आता शंभर लोकांना उपस्थित राहता येईल. अर्थात अशा कार्यक्रमांना उपस्थित राहताना लोकांना फेस मास्क, सोशल डिस्टन्सिंगचे कटाक्षाने पालन करावे लागेल. या ठिकाणांवर थर्मल स्कॅनिंग, सॅनिटायझर यांचा वापर अनिवार्य असेल. 

शाळा, महाविद्यालये आणि खासगी कोचिंग क्लास बंद राहणार असले तरीसुद्धा ऑनलाइन शिक्षणाला मात्र परवानगी असेल. २१ सप्टेंबरनंतर व एकूण कर्मचारी क्षमतेच्या ५०% किंवा १०० पेक्षा कमी संख्येने शिक्षक आणि शैक्षणिक कर्मचाऱ्यांना शाळांमध्ये बोलावता येईल, अशी अट गृहमंत्रालयाने घातली आहे. हीच अट सामाजिक, क्रीडा, मनोरंजन, संस्कृती, धार्मिक आणि राजकीय संघटनांच्या कार्यक्रमांनाही लागू असेल.

आता इयत्ता  नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना कंटेन्मेट झोनबाहेर असलेल्या त्यांच्या शाळांना भेट देता येणार आहे.

आता ई-पासची गरज संपली
राज्यांतर्गत आणि राज्याराज्यांतील वस्तू आणि प्रवाशांच्या वाहतुकीवर यापुढे कोणतीही बंधने नसतील, यासाठी वेगळी परवानगी, मान्यता अथवा ई-परमिटची गरज भासणार नाही असे गृहमंत्रालयाने म्हटले आहे. सरकारने पुन्हा आरोग्य सेतू ॲपच्या वापरावर भर दिला आहे.

यांना परवानगी

 • शंभर लोकांसह सार्वजनिक कार्यक्रम
 • शाळा, महाविद्यालयांत ५० टक्के स्टाफ 
 • सोशल डिस्टन्सिंगसह दुकाने
 • ओपन एअर थिएटर (२१ सप्टेंबरपासून)
 • कौशल्य विकास प्रशिक्षण
 • उच्च शिक्षण संस्थांतील शोध कार्य

हे बंदच 

 • शाळा
 •  महाविद्यालये
 •  कोचिंग क्लासेस
 •  जलतरण तलाव
 •  सिनेमागृहे

संबंधित बातम्या