कोरोनाचा भारतात आढळलेला नवीन 'स्ट्रेन' किती धोकादायक आहे?

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 29 डिसेंबर 2020

कोरोनाच्या नवीन स्ट्रेनची संसर्ग करण्याची क्षमता जुन्या कोरोनाहून ७० टक्के अधिक असून त्याच्यातील नवीन म्युटेशन कोरोना विषाणूमध्ये १७ नवीन बदल घेऊन आला आहे. यामुळे हा विषाणू अधिक धोकादायक असल्याचे बोलले जात आहे.

नवी दिल्ली- कोरोनाचा नवीन स्ट्रेन आता भारतातही पसरण्यास सुरूवात झाली आहे. भारतात आतापर्यंत ६ लोकांना या नवीन कोरोनाची लागण झाली असून हे सर्व नुकतेच ब्रिटेनमधून प्रवास करून आले आहेत. त्यांना अलगीकरणात ठेवण्यात आले आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार  बंगळूर येथील  नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अॅण्ड न्युरो सायंसेसमध्ये यापैकी तीन प्रवाश्यांची चाचणी करण्यात आली होती. या चाचणीत हे तीनही प्रवासी पॉझिटिव्ह आढळले होते. याशिवाय आणखी दोन प्रवाश्यांची हैदराबाद येथे तर एका रूग्णाची पुण्याच्या नॅशनल इंस्टिटयूट ऑफ व्हायरॉलॉजी येथे चाचणी करण्यात आली होती ज्यात ते या नवीन स्ट्रेनने पॉझिटिव्ह आढळले.

गृह मंत्रालयाकडून नुकतेच कोरोनाच्या नव्या स्ट्रेनसंदर्भात काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. याशिवाय यासाठी नवीन गाईडलाईन्सही प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. तसेच जुन्या गाईडलाईन्सही ३१ जानेवारी पर्यंत सक्तीच्या करण्यात आल्या आहेत.   

कोरोनाचा नवीन स्ट्रेन किती धोकादायक आहे? 

कोरोनाच्या नवीन स्ट्रेनची संसर्ग करण्याची क्षमता जुन्या कोरोनाहून ७० टक्के अधिक असून त्याच्यातील नवीन म्युटेशन कोरोना विषाणूमध्ये १७ नवीन बदल घेऊन आला आहे. यामुळे हा विषाणू अधिक धोकादायक असल्याचे बोलले जात आहे. विशेषत: लहान मुले आणि तरूणांमध्ये हा विषाणू वेगाने पसरत असल्याचे निदर्शनास आले आहे.   
का वेगाने पसरतोय नवा स्ट्रेन?

जगभरात हा कोरोनाचा नवा स्ट्रेन वेगाने पसरत आहे. या विषाणूने आपल्या नव्या प्रकारात विषाणू वाढवणाऱ्या प्रोटीनमध्ये बदल केला आहे. ज्याच्या माध्यमातून तो शरीराच्या सुदृढ पेशी भित्तिक्कांवर आरामात हल्ला चढवू शकतो. हेच त्याचे वेगाने पसरण्याचे मुख्य कारण असल्याचे आता तरी सांगण्यात येत  आहे. 

अद्याप किती देशांमध्ये पसरलाय हा नवीन स्ट्रेन? 

कोरोना विषाणूचा नवीन स्ट्रेन सर्वांत आधी ब्रिटेनमध्ये आढळून आला होता. त्यानंतर अनेक देशांमध्ये हा नवीन स्ट्रेन पोहोचला आहे. यात डेनमार्क, हॉलंड, ऑस्ट्रेलिया, इटली, स्वीडन, फ्रान्स, स्पेन, स्वित्झर्लंडस, जर्मनी, कॅनडा, जपान, लेबनॉन आणि सिंगापूर यांसारख्या देशांचा यात समावेश आहे. 

कोरोनाच्या नवीन स्ट्रेनवर लशीचा परिणाम होईल?

 कोरोना विषाणूचा नवीन स्ट्रेन अधिक धोकादायक आहे. मात्र, कोरोनाच्या नवीन प्रकारावर लस प्रभावी ठरणार नाही हे मानायला अजून जागा नाही, असे शास्त्रज्ञांचे मत आहे. लस यावर प्रभावी ठरली नाही तरी या नव्या स्ट्रेनवर लस आणण्यासाठी जास्त काळ लागणार नाही असेही एका औषध निर्माण कंपनीने सांगितले आहे. 

कोरोनाच्या नव्या रूपापासून स्वत:ला कसे वाचवाल?

जुन्या नियमांचेच काटेकोर पालन केल्यास या नवीन स्ट्रेनपासूनही बचाव होवू शकेल असे वैज्ञानिकांकडून सांगण्यात येत आहे.  नव्या स्ट्रेनची संसर्ग करण्याची क्षमता अधिक असल्याने जुन्या नियमांपेक्षा अधिक काटेकोर पालन करावे लागणार आहे, असेही अनेक वैद्यकीय तज्ञांकडून सांगण्यात येत आहे.  

 

संबंधित बातम्या