'हॉवित्झर' या जगातील शक्तीशाली स्वदेशी तोफेची भारताकडून यशस्वी चाचणी

वृत्तसंस्था
रविवार, 20 डिसेंबर 2020

संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (डीआरडीओ) स्वदेशी हॉवित्झर तोफेची चाचणी काल केली. या तोफेचा पल्ला ४८ किलोमीटर एवढा आहे. चीनबरोबर गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्‍वभूमीवर लष्कराला अठराशे तोफांची गरज आहे.

नवी दिल्ली :  संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (डीआरडीओ) स्वदेशी हॉवित्झर तोफेची चाचणी काल केली. या तोफेचा पल्ला ४८ किलोमीटर एवढा आहे. चीनबरोबर गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्‍वभूमीवर लष्कराला अठराशे तोफांची गरज आहे. हॉवित्झरमुळे ही गरज पूर्ण होणार असून यानंतर परदेशातून तोफा मागविण्याची आवश्‍यकता राहणार नाही, असे सांगण्यात आले. ‘ॲडव्हान्स्ड टोड अर्टिलरी गन सिस्टिम’ (एटीएजीएस)च्या मैदानावर झालेल्या या चाचणीप्रसंगी ‘डिआरडिओ’चे शास्त्रज्ञ व प्रकल्प संचालक शैलेंद्र व्ही गाढे म्हणाले की, भारताची आतापर्यंतची शक्तीशाली बोफोर्ससह जगातील कोणत्याही तोफेपेक्षा अधिक सक्षम व सर्वोत्कृष्ट आहे. सर्वाधिक वेगवान मानली जाणारी इस्राईलची तोफ प्रणाली ‘एटीएचओएस’चाही यात समावेश आहे. या तोफेची चाचणी आपण सिक्कीममधील चीन सीमेवर आणि पोखरणमधील पाकिस्तानी सीमेवर केलेली आहे. तेथे यातून दोन हजार तोफगोळे डागण्यात आले होते.

‘एटीएजीएस’ ही प्रणाली ‘डिआरडिओ’ने विकसित केली आहे. भारत फोर्ज आणि टाटा ॲडव्हान्स्ड सिस्टिम लिमिटेड या कंपन्यांनी ती तयार केली आहे. भारतीय लष्कराला सध्या १५८० टोड तोफांशिवाय १५९ ‘एटीएजीएस’ आणि ११४ धनुष तोफांची गरज आहे. अशा तऱ्हने लष्कराला एकूण १, ८०० तोफांची गरज आहे. हॉवित्झरची प्रणाली ज्या पद्धतीने काम करीत आहे, ते पाहून या १,८०० तोफांशी गरज भागू शकते, असेही गाढे म्हणाले.

चीन, पाकला आव्हान

ही तोफ चीन व पाकिस्तानकडील तोफांपेक्षा शक्तीशाली आहे का, या प्रश्‍नावर गाढे म्हणाले की, ही जगातील सर्वोत्कृष्ट तोफ आहे. अशा तंत्रज्ञानाचा वापर करून मारा करणारी तोफ कोणत्याही देशाने तयार केली नाही. 

 

हॉवित्झरचे वैशिष्ट

 

  •     ४८ किलोमीटरपर्यंत मारा कण्याची क्षमता
  •     जास्त अंतरामुळे शत्रूच्या हल्ल्यापासून सुरक्षित राहते
  •     शत्रू समोर येण्याची शक्यता कमी
  •     बोफोर्ससह जगातील कोणत्याही तोफेपेक्षा सक्षम

 

४८ किलोमीटरपर्यंत मारा

युद्धस्थितीत ही तोफ शत्रूचा समाचार कशी घेऊ शकते, याचे वर्णन गाढे यांनी केले. ही तोफ ४८ किलोमीटरपर्यंत मारा करू शकते. हे या तोफेचे हेच वैशिष्ट्य आहे. जगातील कोणतीही तोफ एवढ्या अंतरापर्यंत मारा करू शकत नाही. यामुळे युद्धातही ही तोफ शत्रूच्या हल्ल्यापासून सुरक्षित राहू शकेल. अंतर जास्त असल्याने शत्रू आपल्यापर्यंत पोचू शकणार नाही.

 

बोफोर्सपेक्षाही सामर्थ्यशाली

बोफोर्स आणि जगातील अन्य तोफांची ‘एटीएजीएस’शी तुलना करताना गाढ म्हणाले की, हॉवित्झर तोफ एका मिनिटांत पाच फैऱ्या झाडू शकते. अन्य तोफांतून एवढ्या कालावधीत तीन फैऱ्या झाडता येऊ शकतात. याचा पल्ला सर्वांत मोठा ४८ किलोमीटर आहे. बोफोर्स केवळ ३२ किलोमीटरपर्यंत मारा करू शकते. शिवाय हॉवित्झर एका ठिकाणाहून दुसरीकडे वेगाने हलविता येते. 

 

भविष्यकाळाचा विचार

इस्राईलच्या ‘एटीएचओएस’ आणि फ्रान्सच्या ‘नेक्स्टर’ तोफेपेक्षा ‘एटीएजीएस’ची जास्त उपयुक्त आहे, का यावर गाढे म्हणाले, ‘‘जर आपण या तोफांच्‍या गुणवत्तेची तुलना केली तर हॉवित्झर ही जास्त चांगली आहे. वर्तमान नाही तर भविष्यकाळाचा विचार करून तिची निर्मिती केली आहे. २०२७ ते २०३०पर्यंत तिची परिणामकारकता दिसून येईल. आता भारताला तोफांची आयात करण्याची गरज उरणार नाही. ’’

 

अधिक वाचा :

लसीकरण कसे होईल? 

व्हाय इंडिया ते व्हाय नॉट इंडिया ; आगामी २७ वर्षं भारतीयांची स्वप्नं व समर्पणाच्या परीक्षेची

देशहिताशी तडजोड अथवा भारताचे नुकसान कदापि सहन करणार नाही : संरक्षणमंत्री राजनाथसिंह

संबंधित बातम्या