अल-कायदाचा कट उधळला: केरळ, प. बंगालमध्ये एनआयएचे छापे, नऊजणांना अटक

वृत्तसेवा
रविवार, 20 सप्टेंबर 2020

देशामध्ये पाय रोवण्याचा प्रयत्न करणारी कुख्यात दहशतवादी संघटना अल-कायदा हिचे हल्ले घडवून आणण्याचे मनसुबे सुरक्षा यंत्रणांनी आज उधळून लावले.

नवी दिल्ली/ तिरुअनंतपुरम: देशामध्ये पाय रोवण्याचा प्रयत्न करणारी कुख्यात दहशतवादी संघटना अल-कायदा हिचे हल्ले घडवून आणण्याचे मनसुबे सुरक्षा यंत्रणांनी आज उधळून लावले. राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) पश्‍चिम बंगाल आणि केरळमध्ये आज सकाळीच छापे घालत नऊ जणांना अटक केली. देशामध्ये विविध ठिकाणांवर आत्मघाती हल्ले घडवून आणण्याचा कट या दहशतवाद्यांकडून आखला जात होता.

गुप्तचर संस्थांकडून या संशयित दहशतवाद्यांची माहिती मिळाल्यानंतर ‘एनआयए’ने कारवाईला सुरुवात केली होती, यामध्ये स्थानिक पोलिस अधिकारीदेखील सहभागी झाले होते. ‘एनआयए’च्या या कारवाईला शनिवारी मध्यरात्रीच सुरुवात झाली होती. 

केरळमधील एर्नाकुलम आणि पश्‍चिम बंगालमधाल मुर्शीदाबाद या दोन जिल्ह्यांमध्ये छापे घालत नऊ जणांना अटक करण्यात आली. मुर्शीद हसन, याकूब विश्‍वास, मोसारफ होसेन यांना एर्नाकुलममधून तर नजमूस साकीब, अबू सुफीयान, मैनुल मोंडल, लिवू यीन अहमद, अल मामून कमाल आणि अतितूर रेहमान यांना मुर्शिदाबादेतून अटक करण्यात आली.

हसन हा कुख्यात गुंड असून त्याला केरळमधून अटक करण्यात आली असलीतरीसुद्धा तो मूळचा पश्‍चिम बंगालचा रहिवासी असल्याचे एनआयएच्या प्रवक्त्याने सांगितले.

आक्षेपार्ह साहित्य जप्त
डिजिटल उपकरणे, जिहादी साहित्य, धारदार शस्त्रे, देशी बनावटीचे कट्टे, स्फोटके आदी साहित्य या संशयित दहशतवाद्यांच्या ताब्यातून जप्त करण्यात आले आहे. देशामध्ये आत्मघाती हल्ले घडवून आणण्यासाठी ही मंडळी स्वयंचलित शस्त्रे खरेदी करण्याच्या विचारात होती, त्यांच्यातील काहींनी आयईडीच्या निर्मितीमध्ये प्रावीण्य मिळवायला सुरवात केली होती, असेही तपासातून निष्पन्न झाले आहे.

सोशल मीडियाचा वापर
आरोपींनी फटाक्यांचे रूपांतर आयईडीच्या स्फोटकामध्ये करण्याचा प्रयत्न केला होता. एनआयएच्या अधिकाऱ्यांनी अबू सुफीयान याच्या घरातून बॅटऱ्यादेखील जप्त केल्या होत्या. या प्रकरणामध्ये ज्यांना अटक करण्यात आली आहे ती सगळीच मंडळी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून पाकमधील दहशतवाद्यांच्या म्होरक्यांच्या संपर्कात होती. 

राजौरीत तीन दहशतवाद्यांना अटक
जम्मू-काश्‍मीरमध्ये सुरक्षादलांची दहशतवाद्यांविरोधातील कारवाई सुरूच असून, आज राजौरीतून तीन दहशतवाद्यांना अटक करण्यात आली. पाकिस्तानने या भागामध्ये ड्रोनमधून टाकलेली शस्त्रे ताब्यात घेण्यासाठी हे दहशतवादी या भागामध्ये आले होते. या दहशतवाद्यांच्या ताब्यातून मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा जप्त करण्यात आला असून, ते तिघेही दक्षिण काश्‍मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील रहिवासी असल्याचे समजते.

संबंधित बातम्या