"राष्ट्रीय लोकशाही आघाडी बिहारच्या विकासासाठी एकत्र काम करेल: पंतप्रधान नरेंद्र मोदीं"

गोमंतक वृत्तसेवा
मंगळवार, 17 नोव्हेंबर 2020

संयुक्त जनता दलाचे नेते लोकप्रिय नेते नितीशकुमार यांनी सोमवारी सातव्यांदा बिहारचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. येथील राजभवनात राज्यपाल फागू चौहान यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.

पाटणा:  संयुक्त जनता दलाचे नेते लोकप्रिय नेते नितीशकुमार यांनी सोमवारी सातव्यांदा बिहारचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. येथील राजभवनात राज्यपाल फागू चौहान यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. नितीशकुमार यांच्यासोबत १४ मंत्र्यांनीही शपथ घेतली आहे. कॉंग्रेस आणि राष्ट्रीय जनता दलाने शपथविधी सोहळ्यावर बहिष्कार टाकला. बिहार ‘एनडीए’ तील सर्वांत मोठा घटक पक्ष असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या वतीने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि पक्षाचे अध्यक्ष जे.पी. नड्डा उपस्थित होते. नितीशकुमार यांच्यासोबत भारतीय जनता पक्षाचे सात, जदयूचे पाच तर हिंदुस्थान अवाम मोर्चा आणि विकासशील इन्‍सान पार्टी प्रत्येकी एक अशा चौदा जणांचा आज कॅबिनेटमंत्री म्हणून शपथविधी झाला. माजी मुख्यमंत्री जीतनराम मांझी यांचे पुत्र संतोषकुमार सुमन यांनीही आज मंत्री म्हणून शपथ घेतली आहे. ते विधान परिषदेचे सदस्य आहेत. 

गेल्या २० वर्षात नितीशकुमार यांनी मुख्यमंत्री म्हणून सातव्यांदा शपथ घेतली आहे. बिहारच्या राजकारणात हा एक विक्रम आहे. 
२०१५ च्या विधानसभा निवडणुकीत ‘बिहार में बहार है, नितीशकुमार है’ असा नारा गुंजत होता. यावेळी संयुक्त जनता दलाच्या जागा कमी असल्या तरी ‘बिहार में बहार है. फिर नितीशकुमार है’ असा नारा सर्वश्रुत झाला आहे. नितीशकुमार यांच्या साथीला आता दोन उपमुख्यमंत्री असतील. भाजपचे वरिष्ठ नेते तारकिशोर प्रसाद आणि रेणू देवी यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. शपथविधीला भाजपचे बिहार प्रभारी देवेंद्र फडणवीसही उपस्थीत होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून शुभेच्छा
नितीशकुमार यांनी बिहारचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. एक कुटुंब असलेली  

नितीशकुमार झाले सातव्यांदा मुख्यमंत्री
राष्ट्रीय लोकशाही आघाडी बिहारच्या विकासासाठी एकत्र काम करेल. राज्याच्या विकासासाठी बिहारला केंद्र सरकारकडून सर्वतोपरी सहकार्य मिळेल, असे टवीट मोदी यांनी केले.

नितीशकुमारांचा विक्रम…
बिहारचे मुख्यमंत्री म्हणून कार्यरत राहण्याचा विक्रम श्रीकृष्ण सिंह यांच्या नावावर होता. सिंह हे स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीही मुख्यमंत्री होते. मृत्यूपर्यंत  म्हणजेच १९६१ पर्यंत ते मुख्यमंत्री होते.त्यांचा हा विक्रम आता बिहारच्या राजकारणातील चाणक्य म्हणून ओळखले जाणारे नितीशकुमार यांच्या नावे झाला आहे. २००५ ते २०२० अशा दीर्घ काळात नितीशकुमार मुख्यमंत्री म्हणून कारभार केला आणि आत्ताच्या निवडणुकीत पक्षाला मोठे यश मिळाले नसले तरी भाजपने त्यांनाच मुख्यमंत्री म्हणून पसंती दिली. 

संबंधित बातम्या