युवा नेत्यांकडून नितीश कुमारांची कोंडी

गोमंतक वृत्तसेवा
मंगळवार, 20 ऑक्टोबर 2020

 चिराग पासवान यांना तेजस्वी यांचे समर्थन; मुख्यमंत्र्यांवर टीका

 बिहारच्या निवडणुकीत महाआघाडीकडून राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव आणि लोकजनशक्ती पक्षाचे नेते चिराग पासवान यांच्याकडून टीकेचा भडीमार होत असल्‍याने मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यापुढील अडचणी वाढल्या आहेत.

पाटणा : बिहारच्या निवडणुकीत महाआघाडीकडून राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव आणि लोकजनशक्ती पक्षाचे नेते चिराग पासवान यांच्याकडून टीकेचा भडीमार होत असल्‍याने मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यापुढील अडचणी वाढल्या आहेत.

तेजस्वी यादव यांनी सोमवारी चिराग यांची बाजू घेतली.नितीश कुमार यांनी चिराग पासवान यांच्याबरोबर जे केले ते चांगले नाही. चिराग यांना त्यांच्या वडिलांची कधी नव्हे ते आत्ता गरज आहे. पण रामविलास पासवान आता आपल्यात नाहीत आणि याचे आम्हाला दुःख आहे. नितीश कुमार यांची वर्तणूक चिराग यांच्यावर अन्यायकारक होती,’’ असे ते म्हणाले. ‘वडिलांचे पार्थिव घेऊन पाटण्याला पोचलो असताना नितीश कुमार यांनी दुर्लक्ष करुन आपला अपमान केल्याचे चिराग यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते. हा संदर्भ घेत तेजस्वी यादव यांनी नितीश कुमार यांच्यावर आज निशाणा साधला. 

चिराग पासवान यांना समर्थन देण्यामागे तेजस्वी यांची राजकीय खेळी असल्याचे मत जाणकार व्यक्त करीत आहेत. या दोन्ही युवा नेत्यांचे वडील हे पूर्वी एकमेकांचे सहकारी होते. 
समाजवादी चळवळ ते नितीश कुमार यांच्यासह सहभागी झाले असल्याचा इतिहास आहे. या दोघांचा राजकीय शत्रू एकच असल्याने राघोपूर मतदारसंघाबाबत त्यांनी तडजोड केली असल्याची चर्चा आहे. येथे ‘आरजेडी’कडून तेजस्वी यादव निवडणूक रिंगणात आहेत. 

‘एलजेपी’ला ‘जेडीयू’पेक्षा जास्त जागा

"बिहारच्या निवडणुकीत लोकजनशक्ती (एलजेपी) पक्षाला संयुक्त जनता दलापेक्षा (जेडीयू) जास्त जागा मिळतील, असा दावा करीत चिराग पासवान यांनी करून पुन्हा मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर हल्ला चढविला. नितीश कुमार यांच्या ‘जेडीयू’ला मत दिल्यास बिहार नष्ट होईल. ‘एलजेपी’ जास्त जागा मिळवून ‘बिहार फर्स्ट’ या घोषणेसह नवा बिहार घडवू, असे आश्‍वासन त्यांनी दिले."

मोदी, योगींच्या सभांवर दहशतवादी हल्ल्याचा धोका

"पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांच्या प्रचार सभांवर दहशतवादी हल्ला होण्याचा धोका असल्याने दक्षतेचा इशारा दिला. या पार्श्‍वभूमीवर खबरदारी बाळगण्याची सूचना बिहार पोलिस मुख्यालयाने न्यायदंडाधिकारी आणि जिल्हा पोलिस अधीक्षकांना पत्राद्वारे केली आहे."

मंत्रिमहोदयांना हुसकावले 

"बिहार निवडणुकीचा प्रचार जोर धरु लागला आहे. बिहारचे मंत्री व समस्तीपूर -कल्याणपूर मतदारसंघातील उमेदवार महेश्‍वर हजारी यांनाही विरोधाचा सामना करावा लागला. समस्तीपूर सभेत ते मतांसाठी आवाहन करीत असताना लोकांचा राग अनावर झाला आणि त्यांनी मंत्रिमहोदयांकडून कामाचा हिशेब मागितला. त्यांनी गावात प्रवेश कसा केला, असा जाबही विचारला." 

संबंधित बातम्या