आरक्षणाची खेळी..!

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 31 ऑक्टोबर 2020

विविध जातींसाठी त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण असावे, अशी भूमिका बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी आज मांडली. जणगणना केल्यानंतर याबाबतचा निर्णय घेता येऊ शकतो, असेही त्यांनी लगेच स्पष्ट केले.

पाटणा : विविध जातींसाठी त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण असावे, अशी भूमिका बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी आज मांडली. जणगणना केल्यानंतर याबाबतचा निर्णय घेता येऊ शकतो, असेही त्यांनी लगेच स्पष्ट केले.

शिक्षण, बेरोजगारी आणि रोजगार या समस्यांवर केंद्रीत असलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात आता आरक्षणाचा मुद्दा आला आहे. ‘प्रत्येक जातीच्या लोकसंख्येनुसार आरक्षण असावे याबाबत कोणतेही दुमत नाही. मला मतांची चिंता नाही. जनतेने काम करण्याची संधी दिली, आम्ही काम करून दाखविले. आता जनतेसमोर आलो आहोत. काम करण्याची पुन्हा संधी मिळाली तर आणखी काम करेन, तुमच्याशी चर्चा करून राहिलेल्या समस्याही सोडवू,’ अशी भूमिका नितीशकुमार यांनी पश्चिम चंपारणमधील वाल्मीकीनगर येथे प्रचारसभेत मांडली. वाल्मीकीनगरमध्ये सात नोव्हेंबरला लोकसभेच्या एका जागेसाठी पोट निवडणूक होत आहे. संयुक्त जनता दलाचे खासदार वैद्यनाथ महातो यांच्या निधनामुळे ही निवडणूक होत 
आहे. 

वाल्मीकीनगरमध्ये थारू जातीच्या नागरिकांचे प्राबल्य आहे. त्यांनी आरक्षणाची आग्रही मागणी केली आहे. त्याचे समर्थन नितीशकुमार यांनी केले. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी संपूर्ण देशासाठी काम करीत आहेत आणि बिहारच्या विकासासाठी विशेष साह्य पुरवीत आहेत, असे 
सांगितले.

सत्तेवर आल्यास मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत दहा लाख नोकऱ्या देण्याच्या राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांच्या आश्वासनावर टीका करताना ते म्हणाले, ``राष्ट्रीय जनता दल १५ वर्षे सत्तेत होते. त्यांनी ९५ हजार नागरिकांना नोकऱ्या दिल्या. तर माझ्या कारकिर्दीत सहा लाख जणांना नोकऱ्या देण्यात आल्या, तर कामाच्या इतर संधीही उपलब्ध झाल्या.`` काही जण समाजात दुफळी माजविण्याच्या प्रयत्नात आहेत. परंतु, माझी तुम्हा सर्वांना हात जोडून विनंती आहे की अशा लोकांच्या कारस्थानाला बळी पडू नका. माझ्यासाठी संपूर्ण बिहार हे माझे कुटुंब आहे. काही जण मात्र केवळ स्वतःसाठी, पत्नी व मुलांसाठी काम करतात, असेही नितीशकुमार म्हणाले.

‘मतांची चिंता नाही’
वाल्मिकीनगरमध्ये थारू जातीचे मतदार मोठ्या संख्येने आहेत. या जातीचा समावेश अनुसूचित जमातीमध्ये करण्याची मागणी होत आहे. यावर बोलताना नितीशकुमार म्हणाले की, अटल बिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात रेल्वे मंत्री असल्यापासून मी थारू जातीला आरक्षणाचा लाभ मिळावा, असा प्रयत्न करीत आहे. हा निर्णय माझ्या हातात नसली तरी यापुढेही यासाठी प्रयत्न करेन. यासाठी मला मतांची चिंता नाही.

संबंधित बातम्या