‘कोरोनील’वर बंदी नाही ः रामदेवबाबा

Dainik Gomantak
गुरुवार, 2 जुलै 2020

पतंजलीचे औषध देशात उपलब्ध होणार असल्याचा दावा

हरिद्वार

कोरोनाव्हायरसवर पतंजलीने तयार केलेल्या कोरोनील या आयुर्वेदिक औषधावर कोणतीही बंदी नाही आणि हे औषध देशभरात उपलब्ध होईल, असा दावा योगगुरु रामदेवबाबा यांनी बुधवारी केला.
पत्रकार परिषदेत बोलताना रामदेवबाबा म्हणाले, ‘‘कोरोनाच्या प्रतिबंधासाठी पतंजली काम करीत आहे. ‘उपचार’ हा शब्द वापरला नव्हता. या औषधात धातूची कोणताही घटक नाही. आयुष मंत्रालयाशीसंबंधित असलेल्या राज्य विभागाकडून आम्ही या औषधासाठी परवाना मिळविला आहे.’’
‘‘आयुष मंत्रालयाशी आमचे मतभेद नाहीत. आता कोरोनील, श्‍वासारी, गिलोय, तुळशी, अश्‍वगंधा यांच्यावर कोणतेही निर्बंध नाहीत. हे औषध (श्‍वासारी कोरोनील संच) कोणत्याही कायदेशीर आडकाठीशिवाय आजपासून देशभरात उपलब्ध होईल, असा दावा रामदेवबाबा यांनी केला. औषधावर कसलीही बंदी नाही. यासाठी मी आयुष मंत्रालय आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धन्यवाद देतो, असेही ते म्हणाले.

‘मोदी, शहांना भेटलो नाही’
‘कोरोनील’वर एवढा वाद होऊनही हे औषध बाजारात आणण्याची परवानगी कशी मिळाली, सरकारबरोबर तुम्ही कोणती तडजोड केली, असे विचारले असता रामदेवबाबा म्हणाले की, कोणतीही तडजोड केलेली नाही. यात कोणतीही लपवाछपवी नाही. मी लोकांचे भले चिंततो. मी पंतप्रधान कार्यालय किंवा अमित शहा यांच्या गृह मंत्रालयाशी चर्चा केलेली नाही. आयुष मंत्रालय सोडून कोणत्याही बड्या नेत्याबरोबरही बोललो नाही. ‘आयुष’ने सांगितले की, स्वामीजी तुम्ही ‘बरे करणे’ अशा शब्दांचा वापर करू नका, बाकी जे करीत आहात ते सुरू ठेवा. मंत्रालयाचा हा सल्ला आम्ही मानला आहे.

‘आयुर्वेदात काम करणे गुन्हा’
कोरोनावरील औषधाच्या दाव्यानंतर त्यांच्यासह कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी बालकृष्ण यांच्याविरोधात जयपूर येथे ‘एफआयआर’ दाखल करण्यात आली आहे. यावर रामदेवबाबा म्हणाले की, भारतात योग आणि आयुर्वेद क्षेत्रात काम करणे हा गुन्हा आहे, असेच यावरुन वाटते.

संबंधित बातम्या