वाद सुटण्याची शाश्वती नाही

PTI
शनिवार, 18 जुलै 2020

राजनाथ सिंह ; लडाख दौऱ्यावेळी जवानांशी केली चर्चा

लुकुंग (लडाख)

चीनबरोबरील सीमावाद सोडविण्यासाठी चर्चा सुरू आहे. मात्र, या चर्चेतून कितपत मार्ग निघेल याची शाश्वती देता येणार नाही, असे संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांनी आज सांगितले. चीनची गलवान खोऱ्यात घुसखोरी, नंतर सैन्य माघारीचे आश्वासन देऊनही कार्यवाहीत टाळाटाळ या चीनच्या वागण्यामुळे त्यांच्यावर भारताचा विश्वास नसल्याचे प्रतिबिंब राजनाथ यांच्या विधानात दिसले.
लडाख दौऱ्यावर आलेल्या राजनाथ यांनी येथे भारतीय लष्कराच्या आणि भारत-तिबेट सीमा पोलिस दलाच्या जवानांशी संवाद साधला. भारत आणि चीन वादाच्या पार्श्वभूमीवर राजनाथ सिंह लडाख दौऱ्यावर आले आहेत. भारताची एक इंचभरही भूमी कोणी बळकावू शकत नाही, असा ठाम विश्वास त्यांनी आज व्यक्त केला. ते म्हणाले,''सीमावाद मिटविण्यासाठी चर्चा सुरू आहे, पण हा वाद किती प्रमाणात सुटेल ते सांगता येणार नाही. चर्चेतूनच मार्ग निघाला तर ते फारच उत्तम होईल. मी तुम्हाला इतकेच आश्वासन देतो की, भारताची इंचभरही भूमी जगातील कोणतीही शक्ती बळकावू शकत नाही.'' यावेळी सरसेनाध्यक्ष जनरल बिपीन रावत आणि लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे उपस्थित होते.
राजनाथसिंह यांनी जवानांचे तोंडभरून कौतुक केले. चिनी सैनिकांबरोबर गेल्या महिन्यात झालेल्या झटापटीत आपल्या जवानांनी केवळ देशाच्या सीमेचेच नव्हे, तर 130 कोटी भारतीयांच्या स्वाभिमानाचे रक्षण केले आहे, असे ते म्हणाले. सीमावाद सुरू झाल्यावर राजनाथ प्रथमच लडाखला आले आहेत.

राजनाथ उवाच...
- जवानांनी वेळोवेळी केलेल्या कामगिरीचा भारतीयांना अभिमान
- जवानांचे हौतात्म्य वाया जाणार नाही
- जवानांनी जनतेच्या अभिमानाचे रक्षण केले आहे

जवान काहीही सहन करतील, पण आत्मसन्मानाला धक्का बसू देणार नाहीत. त्यांच्यासाठी देशाभिमान सर्वोच्च असतो. ज्या ज्या वेळी सीमेवर कोणी वाकड्या नजरेने पाहिले आहे, देशाचा आत्मसन्मान जागृत झाला आहे.
- राजनाथ सिंह, संरक्षण मंत्री

पिका मशीनगन हाताळली
राजनाथसिंह यांनी आज सीमेवरील ठाण्यांना भेट देत युद्ध सज्जतेचा आढावा घेतला. पॅरा ड्रॉपिंगबरोबरच त्यांनी पिका मशीन गनसह विविध शस्त्रांची पाहणी केली. राजनाथसिंह यांच्यासमोर लेह येथे रणगाडे आणि युद्ध वाहनांनी प्रात्यक्षिकही केले.

अशी आहे पिका मशीनगन
- चार किमी अंतरापर्यंत मारा करण्याची क्षमता
- एक मिनिटात 650 ते 800 गोळ्या मारण्याची क्षमता

संपादन - अवित बगळे

संबंधित बातम्या