सर्वांना लसीकरणाची आवश्‍यकता भासणार नाही

दैनिक गोमन्तक
बुधवार, 2 डिसेंबर 2020

थोड्या लोकसंख्येला कोरोनाची लस देऊन हा संसर्ग नियंत्रणात ठेवण्यास यश आल्यास संपूर्ण देशात लसीकरण मोहीम राबविण्याची आवश्‍यकता नसल्याचे सरकारचे म्हणणे आहे.

नवी दिल्ली: सध्या अवघ्या देशाचे लक्ष हे कोरोना लसीकरणाकडे लागले असताना भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर) आणि केंद्राकडून वेगळाच दावा करण्यात आला आहे. थोड्या लोकसंख्येला कोरोनाची लस देऊन हा संसर्ग नियंत्रणात ठेवण्यास यश आल्यास संपूर्ण देशात लसीकरण मोहीम राबविण्याची आवश्‍यकता नसल्याचे सरकारचे म्हणणे आहे.

आयसीएमआरचे महासंचालक बलराम भार्गव म्हणाले की, ‘लसीकरणाचे यश हे त्याच्या प्रभावावर अवलंबून असेल. आमचा उद्देश हा कोरोनाच्या संसर्गाची साखळी तोडणे हा आहे. यामध्ये आम्हाला यश आले तर सर्वांना लसीकरण करण्याची आवश्‍यकता भासणार नाही.’ आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले की, केंद्र सरकारने याआधी कधीच पूर्ण लोकसंख्येचे लसीकरण करण्याचे आश्‍वासन दिलेले नाही. अशा गोष्टींबाबत वैज्ञानिक तथ्याचा आधार घेणे अधिक योग्य असते.

पुणे चेन्नईतील स्वयंसेवकाच्या ढासळलेल्या आरोग्याबद्दल आम्हाला सहानुभूती आहे. पण याचा कोविशिल्ड लशीच्या चाचणीशी कोणताही संबंध नसल्याचे नैतिक समिती आणि डेटा ॲण्ड सेफ्टी मॉनिटरिंग बोर्डाच्या मुख्य तपासणी अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे, असा दावा सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने केला आहे.

कोविशिल्ड लस टोचून घेतल्यामुळे मेंदुशी निगडित आजारांची गंभीर लक्षणे दिसून येत असल्याचा दावा चेन्नईतील एका नागरिकाने केला होता. संबंधित संस्थांना नोटीस पाठवून पाच कोटीची नुकसान भरपाईची मागणीही त्यांनी केली आहे. त्या पार्श्‍वभूमीवर सिरम इन्स्टिट्यूटने हा खुलासा केला आहे. कोविशिल्डच्या चाचणीसाठी आवश्‍यक सर्व नियमांसह नैतिक तत्त्वांचे आणि मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करण्यात येत आहे. यासंबंधीची सर्व माहिती आणि अहवाल आम्ही ड्रग्ज कंट्रोल जनरल ऑफ इंडियाला सादर केला असून, पुढील चाचण्या चालू ठेवण्यात येत असल्याचे सिरमने स्पष्ट केले आहे.

ते काम नियामक यंत्रणेचे
सिरम इन्स्टिट्यूटच्या कोविशील्ड या लशीच्या परिणामांवरून वाद निर्माण झाला असताना सरकारने यावर देशाच्या औषध नियंत्रकांचे लक्ष असते असे म्हटले आहे. कोणत्याही लशीची चाचणी करण्यापूर्वी आधी स्वयंसेवकाची परवानगी घेतली जाते. भार्गव म्हणाले की, लशीचे दुष्परिणाम दिसून आल्यास त्यावर लक्ष ठेवण्याचे काम हे नियामक यंत्रणेचे असते.

लस पूर्णपणे सुरक्षित आणि प्रभावी असल्याचे सिद्ध होत नाही, तोपर्यंत लसीकरणासाठी आम्ही तिला बाजारात आणणार नाही. लसींच्या वैद्यकीय चाचण्यांची क्‍लिष्टता लक्षात घेता आणि कंपनीच्या प्रतिष्ठेला धोका पोचविणाऱ्या अन्यायकारक गोष्टींविरुद्ध आम्ही कायदेशीर नोटीस पाठवत आहोत.   
- सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया
 

संबंधित बातम्या