सत्य नव्हे राजपूत मते महत्त्वाची

उज्ज्वल कुमार
शुक्रवार, 7 ऑगस्ट 2020

बिहारच्या पोलिस महासंचालकांचा मुंबई महापालिकेला इशारा

पाटणा

सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणाची सीबीआय चौकशीस परवानगी मिळाली आहे. सीबीआय चौकशीच्या मुद्यावर बिहारमधील सर्व राजकीय पक्ष एकत्र आले, ही बाब आश्‍चर्यकारक आहे. मात्र, आगामी निवडणूकीत हा मुद्दा तापविण्यासाठी आणि राजपूत मते आपल्याकडे खेचण्यासाठीच ही धडपड सुरु असल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे.
सुशांतच्या मृत्यूनंतर जवळपास एक महिनाभर राजकीय आघाडीवर या मुद्याला महत्त्व नव्हते. मात्र, हा मुद्दा उचलून धरल्यास राजपूत मते मिळविता येतील, हे बहुतेक सर्वच पक्षांच्या लक्षात आल्याने सीबीआय चौकशीची झालेली मागणी सर्वांनीच उचलून धरली. राज्यात राजपूतांची लोकसंख्या आठ ते दहा टक्के आहे. राज्यातील राष्ट्रीय जनता दल, संयुक्त जनता दल आणि भाजप या तिन्ही मोठ्या पक्षांना राजपूतांची मते जातात. या मतविभागणीत राजदचा वाटा मोठा आहे. राजद नेते तेजस्वी यादव यांनीच सर्वप्रथम सीबीआय चौकशीची मागणी केली होती. नंतर भाजप आणि ‘जेडीएस’नेही सक्रीय होत सीबीआय चौकशीसाठी शिफारस केली आणि ती मंजूरही केली. राजपूत मतांबरोबरच सीबीआय चौकशीला मंजुरी देऊन केंद्र सरकारने महाराष्ट्रातील शिवसेनेला कोंडीत पकडण्याची संधी साधल्याचे मानले जात आहे.
सीबीआय चौकशीची शिफारस करून ती मंजूर करण्यात झालेली घाई पाहता सर्व गोष्टी आधीपासूनच ठरलेल्या होत्या आणि केवळ संधीची वाट पाहिली जात होती, असा अंदाज बांधता येतो. सुशांत प्रकरणातील सत्य बाहेर आणण्यापेक्षा राजपूत मते हातातून सुटणार तर नाहीत ना, याची अधिक काळजी राजकीय पक्षांना वाटत असल्याची शंका येते.

अधिकाऱ्याला सोडा, अन्यथा न्यायालयात जाऊ
दरम्यान,  अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मृत्युप्रकरणी तपास करण्यासाठी मुंबईत आलेल्या आयपीएस अधिकाऱ्याला ‘बळजबरीच्या विलगीकरणा’तून आजच्या आज सोडले नाही तर कायदेशीर कारवाई करू, असा इशारा बिहारचे पोलिस महासंचालक गुप्तेश्‍वर पांडे यांनी मुंबई महानगरपालिकेला दिला आहे.
सुशांत प्रकरणाच्या तपासासाठी बिहारमधील आयपीएस अधिकारी विनय तिवारी गेल्या आठवड्यात मुंबईत येताच महापालिकेने त्यांना घरात विलगीकरणात ठेवले. या कृतीवर सर्वोच्च न्यायालयाने ताशेरे ओढल्यानंतरही महापालिकेने काहीही दखल न घेतल्याबद्दल गुप्तेश्‍वर पांडे यांनी नाराजी व्यक्त केली. याबाबत पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, ‘तिवारी यांना आजच सोडले नाही तर न्यायालयात जाण्याचा मार्ग आमच्यासाठी खुला आहे. तिवारी यांच्या मुंबई दौऱ्याबाबत महाराष्ट्रातील वरीष्ठ अधिकाऱ्यांना पूर्ण कल्पना दिली होती. तिवारी यांची सर्व माहितीही पाठविली होती. तिवारी यांनी राहण्यासाठी जागेची केलेली विनंती फेटाळण्यात आली. आम्ही ही बाब सोडून दिली. मात्र, त्यांना बळजबरीच्या विलगीकरणात ठेवणे पूर्णपणे अमान्य आहे. आम्ही याबाबत केलेल्या विचारणेला महापालिकेने उत्तरही दिलेले नाही. आज तिवारी यांना सोडले नाही तर आम्ही कायदेशीर कारवाई करू.’
सुशांत मृत्यूप्रकरणाच्या तपासावरून महाराष्ट्र आणि बिहार राज्यातील सरकारमध्ये वाद सुरु आहे. मृत्यू मुंबईत झाला असल्याने या प्रकरणी तपासाचा बिहार पोलिसांना काहीही अधिकार नाही, असे महाराष्ट्राचे म्हणणे आहे. मात्र, बिहारने सीबीआय तपासाची शिफारस करत ती केंद्राने ती मान्यही केल्याने हा वाद वाढला आहे.

इतर पोलिस परतले
सुशांत मृत्युप्रकरणाची चौकशी करण्यासाठी येथे आलेले बिहार पोलिस दलाच्या चार जणांचे पथक आज बिहारला परत गेले. सुशांतच्या वडिलांनी अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि इतरांविरोधात केलेल्या आरोपांचा तपास करण्यासाठी ते येथे आले होते. बिहार पोलिसांनी मुंबईत दहा जणांचा जबाब नोंदविला.

संपादन- अवित बगळे

संबंधित बातम्या