फाटलेल्या जीन्सनंतर आता तीरथसिंग रावत यांचे अजून एक वादग्रस्त वक्तव्य    

फाटलेल्या जीन्सनंतर आता तीरथसिंग रावत यांचे अजून एक वादग्रस्त वक्तव्य    
CM

महिलांच्या फाटलेल्या जीन्स संदर्भातील वक्तव्यावरून अनेक दिवस चर्चेत असलेले उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथसिंग रावत यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले असल्याचे समोर आले आहे. मुख्यमंत्री तीरथसिंग रावत यांच्या या विधानावरून देशात पुन्हा एकदा वादळ होण्याची चिन्हे आहेत. रामनगरमध्ये आंतरराष्ट्रीय वनीकरण दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात रावत यांनी टाळेबंदीच्या वेळी सरकारने वितरीत केलेल्या धान्य मदतीसंदर्भात वक्तव्य केले आहे. याबाबत बोलताना, दोन सदस्यांना 10 किलो तर 20 सदस्यांना एक क्विंटल धान्य का देण्यात आले? यावरून लोकांच्यात चर्चा होत असल्याचे म्हणत, पुन्हा एकदा वेगळेच विधान तीरथसिंग रावत यांनी केले आहे. (Now another controversial statement of Tirath Singh Rawat after torn jeans) 

तीरथसिंग रावत यांनी यावर पुढे बोलताना, हा दोष कुणाचा असल्याचे म्हणत, ज्याने 20 जणांना जन्म दिला त्याचे की ज्यांनी दोन जणांना जन्म दिला त्यांचे, असा प्रश्न विचारला आहे. शिवाय, 20 सदस्य आहेत त्यांना एक क्विंटलच धान्य मिळणार असल्याचे पुढे नमूद करत यावर चर्चा करण्याची गरज नसल्याचे तीरथसिंग रावत यांनी म्हटले आहे. आणि इतकेच नाही तर, जेंव्हा वेळ होता त्यावेळी तुम्ही दोघाजणांना जन्म दिल्याचे सांगून, 20 जणांना का जन्म दिला नाही, असे वक्तव्य तीरथसिंग रावत यांनी आज केले आहे. मात्र यावेळी त्यांनी कोणत्याही जाती किंवा धर्माचे नाव घेतलेले नाही. 

यानंतर, तीरथसिंग रावत (Tirath Singh Rawat) यांनी इतिहासाची मोडतोड करतानाच, भारत 200 वर्षे अमेरिकेचा गुलाम राहिल्याचे सांगितले. त्यामुळे आता तीरथसिंग रावत पुन्हा एका नव्या वादात सापडण्याची शक्यता आहे. तर यापूर्वी मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार हाती घेतल्यानंतर एका आठवड्यातच तीरथसिंग रावत वादात सापडले होते. फाटलेल्या जीन्स प्रकरणाच्या वादानंतर आता पुन्हा त्यांचा नवा व्हिडिओ व्हायरल झाला असून, विरोधकांच्या विरोधाचा सूरही तीव्र झाला आहे.      

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com