बिहारची रणधुमाळी संपताच भाजपच्या ‘मिशन पश्चिम बंगाल’ मोहीमेचेही रणशिंग त्यांनी फुंकले
now BJP is new mission west Bengal

बिहारची रणधुमाळी संपताच भाजपच्या ‘मिशन पश्चिम बंगाल’ मोहीमेचेही रणशिंग त्यांनी फुंकले

नवी दिल्ली : लोकशाही मार्गाने भाजपचा जे मुकाबला करू शकत नाहीत, अशांनी आता काही राज्यांत भाजप कार्यकर्त्यांच्या हत्या करण्याचा रस्ता स्वीकारला असून त्यांचे मनसुबे जनताच उधळून लावेल, असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिला. बिहारची रणधुमाळी संपताच भाजपच्या ‘मिशन पश्चिम बंगाल’ मोहीमेचेही रणशिंग त्यांनी फुंकले. भारतात भविष्यात होणाऱ्या साऱ्या निवडणुकांमध्ये विकास हाच विजयाचा आधार असेल हेच बिहारमधील निवडणुकीने दाखवून दिले, असा दावाही त्यांनी केला.

बिहार व ११ राज्यांच्या पोटनिवडणुकांत भाजपला मिळालेल्या विजयानिमित्त आज रात्री झालेल्या आभारदर्शक सभेत बोलताना मोदींनी ८२ मिनीटांच्या भाषणात विकासकेंद्रीत राजकारण व विरोधकांना इशारे आणि चिमटे यांची सांगड घातली. 


पश्‍चिम बंगालमध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणूक होत आहे. भाजपने मागील लोकसभा निवडणुकीपासूनच या राज्यावर लक्ष केंद्रीत केले आहे. बिहारमधील विजयानंतर या त्यांच्या उद्दीष्टाला बळ मिळाले आहे. मोदींनी आजच्या भाषणात पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनाही अप्रत्यक्षरित्या लक्ष केले. काही पक्षांमधील घराणेशाही हा लोकशाहीसमोरील सर्वांत मोठा धोका आहे असे सांगून पंतप्रधानांनी काँग्रेससह अनेक घराणेबाज नेत्यांवरही कठोर प्रहार केला. पश्‍चिम बंगाल व तृणमूलचे नाव न घेता मोदी म्हणाले की, मला इशारे देण्याची गरज नाही, ते काम जनताच करेल. पण भाजप कार्यकर्त्यांच्या हत्या करून, मृत्युचा खेळ करून कोणी मते मिळवू शकत नाही, हे त्यांनी लक्षात घ्यावे. बिहारमध्ये भाजपच्या विजयात महिलाशक्ती नामक ‘सायलेंट व्होटर’ म्हणजेच मौनातील मतदारांनी त्यांची अपार शक्ती दाखवली असे मोदी म्हणाले. 

नड्डा यांना महत्त्व दिले
पंतप्रधानांनी या भाषणात, ‘नड्डा जी तुम आगे बढो,’ असे म्हणून भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांनाही पुढे आणण्याचा पुन्हा प्रयत्न केला. आजच्या कार्यक्रमात मोदींचे स्वागत करण्यास नड्डाच होते. अमित शहा उपस्थित होते; मात्र त्यांनीही नड्डा यांनाच जास्त सन्मान मिळेल याची काळजी घेतल्याचे वारंवार जाणवत होते.

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com