देशातील संसर्गाने गाठला कोटीचा टप्पा

दैनिक गोमन्तक
रविवार, 20 डिसेंबर 2020

देशातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येने आज १ कोटींचा टप्पा ओलांडला. या संसर्गाला रोखण्यासाठी केंद्राने लसीकरण मोहिमेसाठी वेगाने पावले टाकायला सुरवात केली आहे.

नवी दिल्ली: देशातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येने आज १ कोटींचा टप्पा ओलांडला. या संसर्गाला रोखण्यासाठी केंद्राने लसीकरण मोहिमेसाठी वेगाने पावले टाकायला सुरवात केली आहे. डॉक्‍टरांसह आरोग्यसेवक व पोलिसांसह पहिल्या फळीतील कोरोना योद्धे यांना लसीकरण झाल्यानंतर देशातील सुमारे ८२ लाख लसीकरण केंद्रांवर नागरिकांना लस देण्यास सुरवात करण्याचे नियोजन आरोग्य मंत्रालयाने आखले आहे.

 दरम्यान मागील २४ तासांत २५,१५३ नवे कोरोनाग्रस्त आढळल्यानंतर देशातील एकूण रुग्णसंख्या १ कोटींवर व मृतांचा आकडा १ लाख ४५ हजार १३६ वर पोहोचला आहे. अर्थात ९५ लाखांहून जास्त रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. शुक्रवारच्या तुलनेत आज सकाळपर्यंतच्या चोवीस तासांत रुग्णसंख्या वाढली असली तरी आरोग्य यंत्रणेच्या मते घाबरून जाण्याचे काही कारण नाही. देशात कोरोनाचा उतरता कल कायम आहे.

जगातील सर्वांत मोठे नेटवर्क 
भारतात सार्वभौमिक प्रतिरक्षण कार्यक्रमांतर्गत (यूआयपी) ८२ लाख लसीकरण केंद्रे सध्या आहेत. जगातील हे सर्वांत मोठे वैद्यकीय नेटवर्क मानले जाते. पहिल्या टप्प्यात प्राथमिक आरोग्य केंद्रे व अन्य दवाखान्यांचा लसीकरणासाठी वापर केला जाईल. त्यानंतर जेव्हा नागरिकांना लसीकरण सुरू होईल तेव्हा या केंद्रांचा वापर करण्यात येईल. राज्यांनी या केंद्रांची माहिती कळवून तेथील यंत्रणा सज्ज करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

त्यानंतर केंद्रे सक्रिय
सध्या देशात विविध प्रकारचे लसीकरण करण्यात येणारी ८१ लाख ८७ हजारांहून अधिक केंद्रे (दवाखाने)  आहेत. जेव्हा आरोग्य सेवक, पोलिस व अन्य कोरोना योद्धे यांना लसीकरण होईल त्यानंतर ही केंद्रे सक्रिय करण्यात येतील व तिथे लस पोचविण्यात येईल. राष्ट्रीय आरोग्य मिशनच्या (एनएचएम)अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार पहिल्या टप्प्यात प्राथमिक आरोग्य केंद्रे व सरकारी रुग्णालयेच लसीकरणासाठी उपलब्ध 
राहतील. 

खासगी डॉक्टरांना सामावून घेणार
बीडीएस डॉक्‍टर व अन्य सरकारी डॉक्‍टरांच्या माध्यमातून लसीकरणाची मोहीम पार पाडण्यात येईल. आवश्‍यकता भासली तर यात खासगी डॉक्‍टरांना सहभागी करून घेण्यास राज्य सरकारांना मुभा देण्यात आली आहे. सार्वजनिक आरोग्य केंद्रे व त्यावरील रुग्णालयांत कोरोना लसीकरण केंद्रांची सुरवात करण्यात येणार आहे.

आणखी वाचा:

लसीकरण कसे होईल? -

संबंधित बातम्या