Uttarakhand Accident : चामोलीतील बचाव कार्यात अडथळा; बोगद्यातून येऊ लागले पाणी 

दैनिक गोमन्तक
गुरुवार, 11 फेब्रुवारी 2021

चामोलीतील तपोवन विष्णुगड प्रकल्पातील बोगद्यात अडकलेल्या लोकांच्या बचावासाठी नवनवीन आव्हाने उभी राहत असल्याचे समोर येत आहे.

चामोलीतील तपोवन विष्णुगड प्रकल्पातील बोगद्यात अडकलेल्या लोकांच्या बचावासाठी नवनवीन आव्हाने उभी राहत असल्याचे समोर येत आहे. काल मध्यरात्री ड्रिलवर काम करत असलेल्या पथकाला सकाळी अकरा वाजता आपले धोरण बदलावे लागले आहे. त्यानंतर आता बोगद्याची साफसफाई करून टी पॉईंटकडे जाण्याच्या धोरणावर निर्णय घेण्यात  आला आहे. मात्र सहा मीटर पर्यंत ड्रिल करण्यात आल्यानंतर लोखंडी जाळी आणि काँक्रीटच्या मजबुतीमुळे आणखीन ड्रिलिंग करणे अशक्य होत असल्याची माहिती बचाव पथकाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. 

"देशप्रेम हिच आमची विचारधारा" : पंतप्रधान नरेंद्र मोदी

ड्रिलिंग करणे शक्य होत नसल्यामुळे मुख्य बोगद्यातून चिखल आणि गाळ काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरु करण्यात आले आहे. तर बोगद्यात सुमारे ३४ जण अडकले असण्याची भीती वर्तविण्यात येत आहे. यानंतर उत्तराखंडचे डीजीपी अशोक कुमार यांनी बचाव अभियानाचा एक भाग म्हणून बोगद्यातील चिखल आणि गाळ हटविण्याचे काम केल्याचे सांगितले. तसेच आत मध्ये अडकलेल्यांची परिस्थिती पाहण्यासाठी लहान ड्रिलिंग देखील करण्यात आल्याचे त्यांनी पुढे सांगितले असून, मात्र यावेळेस ड्रिलिंग मशीन तुटल्यामुळे पुन्हा यात अडथळा निर्माण झाल्याचे डीजीपी अशोक कुमार यांनी सांगितले. 

त्यानंतर, एनटीपीसीचे प्रकल्प संचालक उज्ज्वल भट्टाचार्य यांनी याबाबत अधिक माहिती देताना सहा मीटरपेक्षा अधिक पर्यंत आतमध्ये पोहचल्यानंतर याठिकाणाहून पुन्हा पाणी येत असल्याचे सांगितले. आणि काम असेच चालू ठेवल्यास दगड कमकुवत होऊन पुन्हा मोठी दुर्घटना होण्याची संभावना असल्याचे त्यांनी म्हटले आहे. आणि यामुळे काही काळासाठी ड्रिलिंग थांबविण्यात आल्याचे उज्ज्वल भट्टाचार्य यांनी सांगितले आहे. 

याशिवाय, चामोली येथील पोलिसांकडून नदीतील पाण्याची पातळी वाढत असल्याची माहिती मिळाली आहे. आणि त्यामुळे नदीकाठच्या रहिवाशांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. यानंतर डीजीपी अशोक कुमार यांनी आज ऋषिगंगा नदीच्या पातळीत होत असलेल्या वाढीमुळे बचावकार्य तात्पुरते थांबविण्यात आल्याची माहिती दिली आहे. व सखल भागातील स्थानिकांना सुरक्षित जाण्याचे निर्देश देण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच बोगद्यातून पुन्हा पाणी येण्यास सुरवात झाल्यामुळे बचावकार्य थांबविण्यात आले आहे. 

दरम्यान, आतापर्यंत उत्तराखंड पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार 34 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. आणि यापैकी 10 जणांची ओळख पटली असून, अजून 170 लोक अद्यापही बेपत्ता असल्याची माहिती मिळाली आहे.     

संबंधित बातम्या