पुन्हा एकदा जयघोष ‘जय सियाराम’चा

शरद प्रधान
गुरुवार, 6 ऑगस्ट 2020

लॉकडाउनच्या काळात पंतप्रधान मोदींनी केस आणि दाढी वाढवली आहे.

अयोध्या

अनेक वर्षांपासून चर्चिल्या गेलेल्या राममंदिराच्या उभारणीला आज भूमिपूजनाने सुरवात झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते झालेल्या या भूमिपूजनाचा सोहळा कोट्यवधी भारतीयांनी टीव्हीच्या माध्यमातून अनुभवला. आंदोलनाच्या सुरवातीपासून ‘जय श्रीराम’ ही घोषणा देशभरात घुमत होती. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘जय सियाराम’चा जयघोष करत पुन्हा एकदा रामभक्तांची या लाडक्या घोषणेला महत्त्व प्राप्त करून दिलेच, शिवाय भाजपचा दृष्टीकोनही आता बदलला असल्याचे दाखवून दिले.
अनेक शतकांपासून रामभक्त रामाचा जयघोष करताना आधी देवी सीतेचे नाव घेतात. ‘सियापती रामचंद्र की जय’ ही मूळ घोषणा आहे. मात्र, रामजन्मभूमी आंदोलनाच्या काळात ‘जय श्रीराम’ या घोषणेलाच अधिक महत्त्व प्राप्त होऊन मूळ घोषणा मागे पडली. नंतरच्या काळातही राजकीय नेते ‘जय श्रीराम’चाच नारा देत राहिले. पंतप्रधान मोदींनाही कधी कोणी देवी सीतेबद्दल बोलताना फारसे ऐकले नाही. आज भाषणात मात्र त्यांनी वारंवार ‘जानकी माता’ असा सीतेचा उल्लेख केला, शिवाय ‘जय सियाराम’चाही जयघोष केला. आता संघर्ष संपला, शांततेचे युग सुरु झाले, असेच मोदींना सुचवायचे असावे, अशी प्रतिक्रिया अयोध्येतील नागरिकांनी व्यक्त केली. मोदींनीही आपल्या भाषणात दृष्टीकोन बदलणे आवश्‍यक असल्याचे स्पष्टपणे सांगितले. त्यांच्या भाषणाचा सर्व भर भगवान रामाच्या महानतेचे आणि मूल्यांचे महत्त्व सांगण्यावर राहिला.

समर्पक वेशभूषा
लॉकडाउनच्या काळात पंतप्रधान मोदींनी केस आणि दाढी वाढवली आहे. या मागील कारण कोणाला माहित नसले तरी, आज सोनेरी रंगाचा कुर्ता आणि धोती या वेशभूषेवर ते खुलून दिसत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये होती. शिवाय, कार्यक्रमाला आलेल्या साधू-संतांच्या मेळ्यातही मोदींची ही वेशभूषा मिसळून गेली होती.

सगळ्या नजरा मोदींवरच
आजच्या कार्यक्रमासाठी आलेल्यांपैकी सर्वाधिक आकर्षण पंतप्रधान मोदींचेच होते. कोरोनामुळे सर्वजण अंतर ठेवून असल्याने फक्त मोदींवरच कॅमेरा रोखणे कॅमेरामनलाही सोपे गेले. पूजाविधीवेळी मोदींच्या बाजूला उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथही होते. मात्र, केवळ प्रोटोकॉल म्हणून त्यांना टाळता येत नव्हते. बाकी भाजपच्या एकाही बड्या नेत्याला कार्यक्रमाचे निमंत्रण नव्हते. या कार्यक्रमात सरसंघचालक मोहन भागवत यांना विशेष महत्त्व देण्यात आले होते.

संपादन - अवित बगळे

संबंधित बातम्या