अमित शाह यांच्या बनावट भाच्याला आग्र्यात अटक

दैनिक गोमन्तक
सोमवार, 30 नोव्हेंबर 2020

दक्षिण आग्रा भागातील भाजपचे आमदार योगेंद्र उपाध्याय यांनी दिलेल्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली आहे.  

आग्रा- केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांचा भाचा असल्याचे सांगत भाजपच्याच आमदाराला फसविण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. 

उत्तर प्रदेशातील आग्रा शहरात राहणाऱ्या विराज शाह नावाच्या एकाला याप्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे. दक्षिण आग्रा भागातील भाजपचे आमदार योगेंद्र उपाध्याय यांनी दिलेल्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली आहे.  
 
 काय आहे प्रकरण?

 'इंडिया टुडे'ने दिलेल्या वृत्तानुसार, विराज शाह हा भाजपचे आमदार योगेंद्र उपाध्याय यांना मागील पाच ते सहा दिवसांपासून सतत फोन करत होता. स्वत:ला अमित शाह यांचा भाचा असल्याचे सांगत शाह परिवाराला आग्र्यात एक हॉटेल विकत घ्यायचे असल्याचे सांगत होता. याप्रकरणी बोलण्यासाठी तो थेट उपाध्याय यांच्या घरी पोहोचला. दोघांमध्ये चर्चा झाल्यानंतर त्याने आपल्याला शॉपिंग करायची आहे असे सांगत आमदार पुत्राला बरोबर घेत त्याने मार्केट गाठले.  

मिळालेल्या माहितीनुसार, विराजने मार्केटमध्ये एका दुकानातून ४० हजार रूपयांचे कपडे खरेदी करून टाकले. त्यानंतर पैसे देताना त्याने आमदार उपाध्याय यांच्या मुलाला पैसे देण्याचे सांगितले. आमदार उपाध्याय यांच्या मुलाने भुवया उंचावत वडिलांना फोन केला आणि सर्व प्रकार सांगितला. यानंतर उपाध्याय यांना संशय आल्याने त्यांनी गुगलवर विराजचे नाव सर्च केले. यानंतर त्यांना धक्कादायक माहिती मिळाली. विराज शाहने याआधीही असे प्रकार केल्याचे समोर आले. यानंतर आपल्या स्तरावर चौकशी करत त्यांनी त्याबद्दल आणखीन खात्रीशीर माहिती घेतली. यानंतर त्यांनी आपल्या पुत्राला पैसे देऊन कपड्यांसह विराजला घरी येण्याचे सांगितले आणि पोलिसांना कळवले. विराज घरी आल्यानंतर त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले.

दरम्यान, याआधीही विराजने २०१६मध्ये उज्जैन येथे भाजपचे आमदार मोहन यादव यांच्या सहकार्याला लुटले होते. त्या व्यक्तिलाही विराजने अमित शाह यांचा नातेवाईक असल्याचे सांगून गंडवले होते.   

संबंधित बातम्या