भूमिपूजनासाठी एक लाख लाडवांचा प्रसाद

अवित बगळे
शनिवार, 1 ऑगस्ट 2020

प्रसाद बनवण्याची जबाबदारी देवराह बाबा स्थळाच्या अनुयायांकडे देण्यात आली आहे.

नवी दिल्ली

अयोध्येत 5 ऑगस्टला होणाऱ्या राममंदिराच्या भूमिपूजन सोहळ्याची जय्यत तयारी सुरू आहे. संपूर्ण परिसराची सजावट आणि सुशोभिकरण केले जात आहे. प्रभू रामाच्या मूर्तींसाठी लागणारे कपडे आणि प्रसाद म्हणून वाटण्यात येणाऱ्या लाडवांची तयारी अंतिम टप्प्यात आहे. भूमिपूजनासाठी जवळपास एक लाख 11 हजार लाडू तयार केले जात असून, स्टीलच्या डब्यांमध्ये ते ठेवले जात आहेत.
प्रसाद बनवण्याची जबाबदारी देवराह बाबा स्थळाच्या अनुयायांकडे देण्यात आली आहे. हे लाडू भूमिपूजना दिवशी अयोध्या धाम आणि इतर तीर्थक्षेत्रांना प्रसाद म्हणून दिले जाणार आहेत. प्रभूरामासाठी 111 ताटांमध्ये हे लाडू प्रसाद म्हणून दाखविला जाणार आहे.
मंदिराच्या भूमिपूजनाच्या पार्श्‍वभूमीवर शुक्रवारी राज्याचे गृहसचिव अवनिश अवस्थी, अतिरिक्त पोलिस महासंचालक एस. एन. साबत यांनी तेथील परिस्थितीचा
आढवा घेतला. या वेळी हनुमान मंदिरासह अन्य स्थळांना भेटी देत निरीक्षण केले. तसेच संबंधित सचिव आणि जिल्हाधिकाऱ्यांनी आवश्‍यक सुविधांचा आढावा घेतला. भूमिपूजन कार्यक्रमात सोशल डिस्टन्सिंगवर विशेष लक्ष दिले जाणार आहे. केंद्रीय पर्यटनमंत्री प्रल्हादसिंह पटेल व प्रभारी मंत्री नीलकंठ तिवारी मणिराम यांनीही भेट देऊन पाहणी केली.

चारही बाजू सील करणार
भूमिपूजन सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उपस्थिती असल्याने सुरक्षेची पूर्ण काळजी घेतली जात आहे. अयोध्येला चारही बाजूंनी सील करण्याची तयारी सुरक्षा यंत्रणांनी केली आहे. यासाठी अयोध्येसहीत फैजाबाद शहरात प्रवेश मार्ग 5 ऑगस्टला बंद करण्याचे नियोजन केले आहे. मुख्य कार्यक्रमाच्या पूर्वी एक दिवसापासून कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही. लखनौच्या बाजूने येणाऱ्या मार्गाने फक्त व्हीव्हीआयपी मान्यवरांना प्रवेश दिला जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

संबंधित बातम्या