३१ जानेवारीपर्यंत आयात होणाऱ्या कांद्याला सवलती लागू

दैनिक गोमन्तक
शुक्रवार, 18 डिसेंबर 2020

कांद्याच्या दरवाढीवर नियंत्रणासाठी सरकारने आयातीला प्रोत्साहन देतानाच आयात कांद्यावर औषध धुराळणीच्या (फ्युमिगेशन) आणि प्रमाणपत्र सादरीकरणाला मुदतवाढ दिली आहे.

नवी दिल्ली: कांद्याच्या दरवाढीवर नियंत्रणासाठी सरकारने आयातीला प्रोत्साहन देतानाच आयात कांद्यावर औषध धुराळणीच्या (फ्युमिगेशन) आणि प्रमाणपत्र सादरीकरणाला मुदतवाढ दिली आहे. ३१ जानेवारीपर्यंत आयात होणाऱ्या कांद्याला या सवलती लागू असतील. अर्थात, या सवलतींसाठी आयात कांद्याचा साठवणूक किंवा व्यापारी कारणांसाठी उपयोग होणार नाही, असे प्रमाणपत्र आयातदारांकडून घेतले जाईल. 

कृषी मंत्रालयाच्या माहितीनुसार देशांतर्गत बाजारपेठेत कांद्याचे दर कडाडल्यामुळे सरकारने उपाययोजना करताना आयातीला परवानगी देण्याबरोबरच अन्य अटींमध्येही सवलत दिली होती. आयात कांद्यावर औषध धुराळणी, स्वच्छतेशी संबंधित फायटोसॅनिटरी प्रमाणपत्र सादरीकरण यासारख्या निकषांमध्ये सवलत दिली होती. ताज्या निर्णयानुसार ही सवलत ३१ जानेवारी अखेरपर्यंत लागू असेल.

आयात होऊन भारतीय बंदरात पोहोचलेल्या आणि धुराळणी न झालेल्या कांदा साठ्यावर आयातदार व्यापाऱ्यांना मान्यताप्राप्त औषधांद्वारे धुराळणी करता येईल. त्यानंतर या साठ्याची ‘क्वारंटाईन’ अधिकाऱ्यांना तपासणी करून आणि रोगराई किंवा कीटकनाशकांचा अंश त्यावर नसल्याची खात्री झाल्यानंतरच कांदा साठा वितरणासाठी खुला करता येईल.

आणखी वाचा:

‘स्थायी’तील वादावरून राहुल यांचा पत्रप्रपंच -

संबंधित बातम्या