देश दुःखात असताना विरोधकांचे राजकारण

गोमन्तक वृत्तसेवा
रविवार, 1 नोव्हेंबर 2020

पुलवामामध्ये मागील वर्षी झालेल्या दहशतवादी हल्ल्याचे वास्तव हे पाकिस्तानच्या संसदेने देखील मान्य केले असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

केवडिया : पुलवामामध्ये मागील वर्षी झालेल्या दहशतवादी हल्ल्याचे वास्तव हे पाकिस्तानच्या संसदेने देखील मान्य केले असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. जेव्हा संबंध देश हा शूर जवानांच्या हौतात्म्यावर दु:ख व्यक्त करत होता तेव्हा काही मंडळी ही राजकीय लाभासाठी घाणेरडे राजकारण करत होती, अशी टीका त्यांनी केली. देशाचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १४५ व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ला अभिवादन करताना मोदी यांनी उपरोक्त मत मांडले.

पुलवामा हल्ल्यानंतर या मंडळींनी जे भाष्य केले त्याचा देशाला विसर पडलेला नाही, हे घाणेरडे राजकारण स्वार्थ आणि उद्धटपणा यांनी बरबटलेले आहे. अवघा देश शोकसागरामध्ये बुडाला असताना या लोकांच्या उद्धटपणाने शिखर गाठले होते. असे मोदी म्हणाले.

विरोधकांचे स्वार्थकारण
आता पाकिस्ताननेच दहशतवादी हल्ल्याचा स्वीकार केल्यानंतर या लोकांचा खरा चेहरा उघड झाला आहे. पुलवामा हल्ल्यानंतर देशात झालेले राजकारण पाहिले तर एक बाब ठळकपणे दिसून येते ती म्हणजे राजकीय स्वार्थासाठी ही मंडळी कोणत्याही थराला जाऊ शकतात. राजकीय पक्षांनी अशा प्रकारचे राजकारण करू नये कारण त्यामुळे सुरक्षा दलांचे नीतिधैर्य कमकुवत होते.  आपण राष्ट्रविरोधी शक्तींच्या हातातील बाहुले होता कामा नये. जाणते किंवा अजाणतेपणी देखील ही चूक होता कामा नये असेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान पाकिस्तानचे विज्ञान आणि तंत्रज्ञानमंत्री फवाद चौधरी यांनीच पाकच्या संसदेमध्ये बोलताना पुलवामा हल्ल्याची कबुली दिली होती, त्यानंतर देशातील वातावरण आणखी तापले आहे.

पटेलांचे काम पूर्ण केले
सरदार वल्लभभाई पटेल यांचे काम पूर्ण करण्याची संधी मिळाल्याबद्दल मी स्वतःला सुदैवी समजतो. आता काश्‍मीरने विकासाच्या मार्गावर चालायला सुरवात केली आहे. ईशान्येकडील राज्यांमध्ये देखील शांतता आणि सुबत्ता नांदू लागली आहे. सोमनाथ मंदिराच्या उभारणीचे आदेश देऊन पटेल यांनी देशाचा सांस्कृतिक वारसा पुनर्स्थापित करण्याचा यज्ञ सुरू केला होता. 

संबंधित बातम्या