नाहीतर नितीश कुमार यांनी हातात बांगड्या घालाव्यात; तेजस्वी यादव संतापले

दैनिक गोमंतक
बुधवार, 24 मार्च 2021

मंगळवारी झालेल्या प्रकाराबाबत मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी माफी मागावी आणि महिला आमदारांशी गैरवर्तणूक आणि त्यांना मारहाण करणाऱ्या अधिकाऱ्यांवरही कारवाई करावी, अशी मागणी विरोधी पक्षाचे नेते तेजस्वी यादव यांनी केली.

पटना : बिहार विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस होता. शेवटच्या दिवशीही सभागृहात प्रचंड गदारोळ पाहायला मिळाला. मंगळवारी झालेल्या प्रकाराबाबत मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी माफी मागावी आणि महिला आमदारांशी गैरवर्तणूक व त्यांना मारहाण करणाऱ्या अधिकाऱ्यांवरही कारवाई करावी, अशी मागणी विरोधी पक्षाचे नेते तेजस्वी यादव (Tejaswi Yadav) यांनी केली. तसेच अन्यथा विरोधी पक्ष सभागृहावर बहिष्कार टाकेल, असा इशाराही त्यांनी दिल. (otherwise Nitish Kumar should wear bangles Said by Tejaswi Yadav)

यासर्व घटना क्रमाबाबत बोलताना तेजस्वी यादव यांनी मध्यमांशी संवाद साधला.  ''निर्लज्ज कुमार यांना काहीही फरक पडणार नाही. या कायद्यानुसार ते उद्या माजी मुख्यमंत्र्यानाही मारहाण करतील. आम्ही सभागृहात बोलण्यासाठी वेळ मागूनही आम्हाला वेळ देण्यात आला नाही. आम्हाला बोलू दिले गेले नाही.  जर कायदा योग्य आहे तर समोर या आणि आमच्याशी वादविवाद करा, नाहीतर बांगड्या घालून बसा,'' असा इशाराच तेजस्वी यादव यांनी यावेळी दिला. त्याचबरोबर  ''राममनोहर लोहिया जयंती आणि भगतसिंह यांच्या हुतात्मा दिनी बिहार विधानसभेत (Bihar assembly) काळा कायदा लागू करण्यात आला. नितीशकुमार यांच्या सांगण्यावरून आमदारांना मारहाण करण्यात आली. महिला आमदारांची साडी फाडण्यासारखे अश्लीलतेचे  प्रकार झाले. संपूर्ण देश नितीशकुमारांवर थुंकत आहे. त्यांना प्रश्न विचारत आहे, " अशा  शब्दात तेजस्वी यादव यांनी  नितीश कुमार यांच्यावर निशाणा साधला. 

पश्चिम बंगालचा मुख्यमंत्री भूमीपुत्रच होणार; मोदींनी दिले आश्वासन

याव्यतिरिक्त ''सत्ता येते आणि जाते, ही गोष्ट मुख्यमंत्र्याना माहीत असायला हवी. ते स्वतः अनुकंपा वर्गातून आले आहेत. त्यामुळे कोणीही कायमस्वरूपी सत्तेच्या खुर्चीवर बसायला आलेले नाही,'' असा खोचक टोलाही  तेजस्वी यादव यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांना लगावला.  तसेच  "आमचे काम निषेध करणे आहे आणि तो आम्ही सत्यासाठी करत आहोत. अधिवेशन काळात गेला एक महिना आम्ही राज्यातील वस्तुस्थिती मांडण्याचा प्रयत्न केला.  परंतु एकाही प्रश्नाचे उत्तर मिळाले नाही. इथे पूर्णपणे हुकुमशाही सुरू आहे. अधिकारी जसे बोलतात तसे केले जाते. हे  विधेयक पोलिसांचे आहे आणि ते पोलिसांनी जबरदस्तीने मंजूर करून घेतले आहे,'' असा आरोपही त्यांनी केला. 

दरम्यान, या सर्व घडामोडींवर मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar)  यांनी तेजस्वी यांचे नाव न घेता  त्यांच्यावर पलटवार केला. "सभागृहात प्रत्येकाला प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे.  प्रत्येकजण प्रश्न  विचारतो. पण मग काही लोकांच्या मनात काय येते की ते असे वागू लागतात. अशा लोकांचा सल्लागार कोण आहे, मला माहित नाही. पण असे करून त्यांना कोणताही फायदा होणार नाही. ते केवळ आपला वेळ वाया घालवत आहेत. त्यांना मिळालेल्या अधिकारांचा ते योग्य वापर करत नाहीत. सभागृहात प्रत्येकाला  विचारून निर्णय झाला. पण शेवटी काय झाले माहीत नाही, '' असे नितीश कुमार यांनी म्हटले आहे.  

त्याचबरोबर  "काल जे काही घडले ते बरोबर नव्हते. ज्यांच्याकडे बहुमत आहे, ते सरकार बनवतात.  सरकारही बहुमताच्या आधारेच स्थापन केले जाते. तथापि, सर्व लोकांनी आपला मुद्दा सभागृहात मांडला.  कालपर्यंत सभागृहात किती लोक होते, सर्वजण किती बोलत होते. पण माहित नाही शेवटी काय झाले, किती विरोध झाला.  मात्र विधानसभा अध्यक्षांनी परवानगी दिली आणि अखेर विधेयक मंजूर करण्यात आले,'' असे नितीश कुमार यांनी स्पष्ट केले. 

 

संबंधित बातम्या