नराधमाने घेतला पोटच्या मुलांचा बळी

अवित बगळे
रविवार, 26 जुलै 2020

तंत्रसिद्धीसाठी आठ वर्षांत पाच चिमुकल्यांना मारले

जिंद, (हरियाना)

तंत्रसिद्धीसाठी आठ वर्षांत पाच चिमुकल्यांचा जीव नराधम वडिलांनी घेतल्याची घटना डिडवाडा (जि. जिंद) येथे उघडकीस आली. आरोपी जुम्मादिनने पंचायतीसमोर गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी मांत्रिक खजानसिंह याला ताब्यात घेतले आहे. तंत्रसिद्धीसाठी पत्नीच्‍या पोटात वाढत असलेल्या गर्भाच्या जन्मापूर्वी दोन मुलींचा बळी घेणे आवश्‍यक असल्याचे कैथल येथील मांत्रिकाने सांगितले होते. त्यानुसार त्यांना मारुन टाकल्याचे जुम्मादिनने कबूल केले. मुस्कान (वय ११) आणि निशा (वय ७) या मुलींना काही दिवसांपूर्वी त्याने ठार केले. आठ वर्षांपूर्वी नऊ महिन्याच्या बालिकेचा गळा दाबून खून केला तर पाच वर्षांपूर्वी एका वर्षांचा आर्यन आणि दोन वर्षांचा नबी यांना सेल्फस हे विषारी औषध खायला घालून मारले. काळजाचा थरकाप उडवणारी ही बातमी सांगताना जुम्मादिनच्या चेहरा एकमदम मख्ख होता.

मुलींना कालव्यात फेकले
पोलिसांच्या चौकशीत जुम्मादिनने सांगितले की, १४ जुलैला रात्रीच तो मुलींना मारणार होता. पण घरासमोरील दुरुस्तीचे दुकान रात्री उशिरापर्यंत सुरु असल्याने तो त्यांना मारू शकला नाही. मग दुसऱ्या दिवशी कट अमलात आणण्यासाठी त्याने दोन्ही मुलींसह सर्व कुटुंबाला झोपेच्या गोळ्या दिल्या. त्यानंतर एका मुलीला मोटारसायकलवर पुढे बसवून तर दुसरीला पाठीवर घेऊन तो घेऊन गेला आणि त्यांना कालव्यात फेकले. यातील निशाचा मृतदेह १८ रोजी साहनपूरमधून वाहणाऱ्या हासी-बुटाना कालव्याजवळ मिळाला. मुस्कानचा मृतदेह २० जुलैला तिथेच आढळला.
निशाचा मृतदेह मिळाला तेव्हा तिच्या डोक्यावर केस नव्हते. जुम्मादिनच्या घरातून पोलिसांनी मुलीचे केस, वस्तरा आणि काही कपडे जप्त केले. मांत्रिकाच्या सांगण्यावरून मुलांना मारल्याचे आरोपी जुम्मादिनने कबूल केले आहे. तरीही पोलिस या प्रकरणाची सर्व बाजूने चौकशी करीत आहे, अशी माहिती पोलिस उपमहानिरीक्षक अश्‍विन शेणवी यांनी दिली.

मुलगा होण्यासाठी गंडा
पतीने पोटच्या मुलांना अशा भयानक पद्धतीने मारल्याचे समजल्यावर तो असे काही करेल, असे कधीच वाटले नाही, असे त्याची पत्नी रिना म्हणाली. ‘‘दैवाचा प्रकोप झाल्याने मुले मरत आहेत, असे मला वाटत होते. एका वर्षापूर्वी गर्भपात झाल्याने कोणाला तरी विचारावे, असे जुम्मादिनला म्हणाले होते. तो कैथलमधील एका मांत्रिकाकडे गेला होतो. तो अद्याप त्याच्याकडे जात होता. मांत्रिकाने मुलगा होण्यासाठी फळे व गंडा दिला होता. आता माझ्या पोटात सहावे मूल वाढत आहे,’’ असे रिनाने सांगितले.
 

संबंधित बातम्या