टोळांना रोखण्यासाठीची बैठक पाकिस्तानने टाळली

Dainik Gomantak
शनिवार, 20 जून 2020

संयुक्त राष्ट्रांच्या अन्न आणि कृषी संघटनेचे पाकिस्तान आणि भारत हे दोन्ही सदस्य देश आहेत. त्यामुळे टोळधाडीचा प्रतिबंध करण्यासाठी दोन्ही देशांमध्ये बोलणी सुरू आहेत.

नवी दिल्ली

भारत आणि पाकिस्तानात टोळांनी उच्छाद मांडला आहे. त्यामुळे दोन्ही देशांतील पिकांचे मोठे नुकसान होत आहे. त्यावर करावयाच्या उपाययोजनाबांबत बोलावलेली संयुक्त बैठक पाकिस्तानने टाळली. टोळ व्यवस्थापनाबाबत आज (ता.19) दोन्ही देशांची बैठक होणार होती. मात्र, पाकिस्तानने आपल्या उपस्थितीबाबत कोणताही प्रतिसाद दिला नाही, अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयातील प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी दिली. संयुक्त राष्ट्रांच्या अन्न आणि कृषी संघटनेचे पाकिस्तान आणि भारत हे दोन्ही सदस्य देश आहेत. त्यामुळे टोळधाडीचा प्रतिबंध करण्यासाठी दोन्ही देशांमध्ये बोलणी सुरू आहेत.

गुजरातमध्ये प्रवेश
पाकिस्तानातून उत्तरेकडील राज्यात टोळांनी प्रवेश केला आहे. मात्र, त्याचा सर्वाधिक प्रभाव गुरुवारी गुजराथच्या बनासकंठा जिल्ह्यात झाला. या जिल्ह्यात टोळ चार गावांमध्ये ठाण मांडून बसले आहेत, अशी माहिती कृषी अधिकारी प्रमोद पटेल यांनी दिली. हा भाग पाकिस्तानच्या सीमेपासून जवळ आहे. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून 12 हेक्‍टर परिसरात किटकनाशकांची फवारणी केली आहे.

मध्यप्रदेशात हल्ला
मध्यप्रदेशातील शिवपूर जिल्ह्यात गुरुवारी अनेक गावांमध्ये टोळांनी हल्ला केला. या टोळांना परतून लावण्यासाठी आणि त्यांचा उपद्रव कमी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने अधिकाऱ्यांची टीम तयार केली आहे, अशी माहिती उपजिल्हाधिकारी पी. गुजरे यांनी दिली.

संबंधित बातम्या