पाकिस्तानचा डाव अमेरिकेने उधळला

Dainik Gomantak
बुधवार, 24 जून 2020

अमेरिकेने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद (यूएनएससी) च्या सर्व सदस्यांना औपचारिकपणे कळविले की ते पाकिस्तानच्या प्रस्तावाला अधिकृतपणे फेटाळून लावत आहेत.

वॉशिंग्टन

पाकिस्तानमध्ये होत असलेल्या दहशतवादी कारवायांमागे भारताचा हात असल्याचा कांगावा करत दहशतवादाला पाठिंबा देण्याच्या मुद्द्यावर भारताला गुंतविण्याच्या पाकिस्तानच्या योजनेला अमेरिकेने शुक्रवारी हरताळ फासले आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत पाकिस्तानचा भारताच्या विरोधातील प्रस्ताव सादर करण्याची मागणी अमेरिकेने फेटाळून लावत पाकिस्तानचा डाव उधळून लावला आहे.
जम्मू-काश्मीरमध्ये सक्रिय असलेल्या जैश-ए-महंम्मद या दहशतवादी संघटनेवर संयुक्त राष्ट्राने बंदी घालत संघटनेचा म्होरक्या मसूद अझहर याला जागतिक दहशतवादी घोषित केल्यानंतर पाकिस्तानने हा कट रचला होता. मात्र, हा प्रस्ताव दाखल करण्यापूर्वीच अमेरिकेने पाकिस्तानचा प्रस्ताव फेटाळून लावत पाकिस्तानला झटका दिला आहे. शुक्रवारी अमेरिकेने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद (यूएनएससी) च्या सर्व सदस्यांना औपचारिकपणे कळविले की ते पाकिस्तानच्या प्रस्तावाला अधिकृतपणे फेटाळून लावत आहेत. या प्रस्तावाच्या माध्यमातून पाकिस्तानने अफगाणिस्तानात स्थित भारतीय बांधकाम अभियंता वेणू माधव डोंगारा यांना जागतिक दहशतवादी म्हणून घोषित करण्याचा डाव रचला होता.
डोंगारा हे त्या चार भारतीय नागरिकांपैकी एक आहेत ज्यांचे नाव पाकिस्तानने आपल्या प्रदेशातील दहशतवादी कारवायांशी जोडले आहे. डोंगारा यांना यूएनएससीमध्ये जागतिक दहशतवादी घोषित करण्यासाठी पाकिस्तानने चीनची मदत घेतली होती. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये अमेरिकेने हा प्रस्ताव तांत्रिक कारण समोर करत प्रलंबित ठेवला होता. तसेच पाकिस्तान डोंगारा यांच्यावरील आरोप सिद्ध करण्यासाठी आणखी पुरावे सादर करेल अशी अपेक्षाही अमेरिकेने व्यक्त केली होती. मात्र, पाकिस्तान डोंगारा यांच्या विरोधात पुरावे सादर करण्यात अयशस्वी ठरल्याने अमेरिकेने पाकिस्तानच्या प्रस्तावाला सादर करण्याची मागणी फेटाळून लावली.
 

संबंधित बातम्या