ड्रॅगनच्या कुरघोडीवर भारताने केलेल्या 'या' चालीमुळेच सीमावाद निवळला 

दैनिक गोमन्तक
गुरुवार, 25 फेब्रुवारी 2021

भारत आणि चीन या दोन्ही देशांच्या सैन्यात मागील वर्षाच्या जून महिन्यात लडाखच्या गलवान भागात मोठा संघर्ष झाला होता. आणि त्यानंतर दोन्ही देशांमध्ये सीमावादावरून चांगलाच तणाव निर्माण झाला होता.

भारत आणि चीन या दोन्ही देशांच्या सैन्यात मागील वर्षाच्या जून महिन्यात लडाखच्या गलवान भागात मोठा संघर्ष झाला होता. आणि त्यानंतर दोन्ही देशांमध्ये सीमावादावरून चांगलाच तणाव निर्माण झाला होता. चीनने आपले सैन्य मोठ्या प्रमाणावर प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ओलांडत भारतीय हद्दीत घुसवले होते. त्यानंतर भारतीय सैन्याने देखील चीनला जशास तसे उत्तर देत पॅंगॉन्ग सरोवराच्या दक्षिणेकडून अतिउंच भागावर ताबा मिळवला होता. भारताच्या या चालीमुळेच दोन्ही देशांमधील चिघळलेला सीमावाद आणि समोरासमोर आलेले सैन्य मागे घेण्याच्या प्रक्रियेत गेमचेंजर ठरला आहे. 

चीनने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेचे उल्लंघन करत भारताच्या हद्दीत घुसखोरी केली होती. त्यानंतर चीनचे सैन्य मागे हटण्यास तयार नसल्याचे चित्र निर्माण झाले होते. यावर प्रत्युत्तरादाखल भारताने देखील आपले सैन्य पॅंगॉन्ग सरोवराच्या दक्षिणेकडील सर्वात उंच भागात तैनात करण्याचा निर्णय घेतला होता. व भारताच्या या खेळीमुळेच चीनला नमते घ्यावे लागल्याचे सिद्ध झाले होते. तर आता भारताकडून घेण्यात आलेला हा निर्णय व ही कल्पना भारतीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल, तिन्ही सैन्यदलाचे प्रमुख जनरल बिपीन रावत आणि थलसेना प्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांच्यात झालेल्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. व तसेच या बैठकीत कारवाईसाठी तिबेटींसह स्पेशल फ्रंटियर फोर्सचा देखील वापर करण्याचा निर्णय घेण्यात आला होता, अशी माहिती मिळाली आहे.  

चीनचा अजब दावा; राष्ट्राध्यक्ष जिनपिंग म्हणाले...

भारत आणि चीन यांच्यातील सीमावाद मागील वर्षाच्या मे महिन्यात उफाळला होता. आणि त्यानंतर जून महिन्यातील 15 तारखेला दोन्ही बाजूंच्या सैन्यात मोठा संघर्ष झाला होता. यात भारतीय सैन्यातील एका कर्नलसह वीस जवानांना आपले प्राण गमवावे लागले होते. तर यावेळी चीनच्या सैन्याला देखील प्राणहानी झेलावी लागली होती. यानंतर चीनने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या पुढे येत मागे हटण्यास नकार दिला होता. यावर भारतीय सैन्याने देखील पुढची चाल खेळत पॅंगॉन्ग सरोवराच्या दक्षिणेकडील उंचावरील भाग काबीज केले होते. यावर चीनने नरमाई स्वीकारत सैन्य माघारी घेण्याच्या प्रक्रियेला होकार दिला होता. त्यानंतर आता याबाबतची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. आणि त्यानुसार 29 आणि 30 ऑगस्ट रोजी भारतीय सैन्याने वेगवान कारवाई करत रेझांग ला, रिचेन ला आणि मोखपारी यांच्यासह चिंचोळ्या जागांवर नजर ठेवणाऱ्या महत्वाच्या व उंचीवरील ठिकाणी कब्जा केला. 

याव्यतिरिक्त, चीनने केलेल्या आगळिकीला उत्तर देण्यासाठी करण्यात आलेल्या नियोजनात सेनादल प्रमुख जनरल बिपीन रावत, लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे आणि हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल आर के एस भदौरिया यांनी मोलाची भूमिका बजावली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. याशिवाय सैन्य आणि इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस फोर्स यांच्यातील समन्वय सुद्धा चिनी सैन्याला रोखण्यात मदतीचे ठरले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

दरम्यान, या महिन्याच्या  21 फेब्रुवारी रोजी भारत आणि चीन यांच्या सैन्यातील कोअर कमांडर स्तरावरील बैठकीची दहावी फेरी पार पडली. या बैठकीत पॅंगॉन्ग सरोवराच्या परिसरातील आघाडीवरच्या दोन्ही देशांच्या सैन्याच्या तुकड्या सुरळीतपणे मागे घेतल्याची माहिती भारत व चीनने एकमेकांना दिली. भारत आणि चीन यांच्यात झालेल्या कोअर कमांडर बैठकीच्या नवव्या फेरीत दोन्ही देशांच्या सैन्यांनी पॅंगॉन्ग त्सो च्या दक्षिण आणि उत्तरेकडील भागातून माघार घेण्याबाबत सहमती दर्शविली होती. व त्यानुसार दोन्ही देशातील सैन्य आणि टॅंक यांनी पॅंगॉन्ग त्सो च्या दक्षिण आणि उत्तरेकडील किनाऱ्यावरून मागे जाण्याची प्रकिया सुरु केली होती.  

               

संबंधित बातम्या