ऐन थंडीमध्ये राजधानी दिल्लीत बरसल्या पावसाच्या सरी..!

PTI
रविवार, 3 जानेवारी 2021

उत्तर भारतात थंडीची लाट कायम असून लडाखच्या द्रास येथे उणे २६.८ अंश सेल्सिअस एवढ्या नीचांकी तापमानाची नोंद झाली आहे. ऐन थंडीत दिल्लीकरांना काल पावसाच्या सरी अनुभवायास मिळाल्या.

नवी दिल्ली :  उत्तर भारतात थंडीची लाट कायम असून लडाखच्या द्रास येथे उणे २६.८ अंश सेल्सिअस एवढ्या नीचांकी तापमानाची नोंद झाली आहे. ऐन थंडीत दिल्लीकरांना काल पावसाच्या सरी अनुभवायास मिळाल्या. तसेच काश्‍मीरच्या गुलमर्ग येथे उणे ९ तापमान असून येत्या तीन चार दिवसात आणखी हिमवृष्टी होण्याची शक्यता आहे. दिल्लीत थंडीने पंधरा वर्षाचा, हरियानात सहा वर्षाचा तर पंजाबमध्ये ५० वर्षाचा विक्रम तोडला आहे. दिल्लीत काही भागात आज पावसाने हजेरी लावली. मध्य प्रदेश, राजस्थानमध्येही आगामी काही दिवसात पाऊस पडण्याची आणि तापमान घसरण्याची शक्यता वर्तविली जात आहे. 

नववर्षाच्या पहिल्याच दिवशी दिल्लीकरांना कडाक्याच्या थंडीचा सामना करावा लागला. दिल्लीतील तापमान १.१ अंश सेल्सिअसपर्यंत घसरले. हे तापमान गेल्या पंधरा वर्षातील सर्वात कमी नोंदले गेले. गेल्यावर्षी जानेवारीत २.४ अंश तापमान होते. येत्या दोन दिवसात दिल्ली आणि परिसरात दाट धुक्याचे सावट राहण्याची शक्यता आहे. आज पावसाने हजेरी लावली. शहरातील तापमान ७ अंश सेल्सिअस इतके नोंदले गेले. 

माऊंट अबूच्या स्थितीत सुधारणा

राजस्थानच्या माउंट अबू येथील तापमान आज उणे वरून शून्यावर आले. मात्र चुरूतील तापमान अद्याप उणेच आहे. तेथे उणे ०.२ अंश तापमानाची नोंद झाली. जयपूरमध्ये चोवीस तासात किमान तापमान ४.१ अंशाने वाढून ८.७  अंशावर पोचले. हवामान खात्याने येत्या काही दिवसात राज्यातील बहुतांश भागात पाऊस पडण्याची आणि गारा पडण्याची शक्यता वर्तविली आहे. दुसरीकडे मध्य प्रदेशमध्ये उद्या तापमानात बदल होऊ शकतो. झाबुआ, नीमच, ग्वाल्हेर आणि चंबळ खोऱ्यात पावसाची शक्यता वर्तविली आहे. उद्या देखील भोपाळ, उज्जैन, इंदूर भागात काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. 

पंजाबमध्ये भटिंडा सर्वात थंड

पंजाबच्या थंडीने ५० वर्षातील विक्रम मोडला आहे. १९७० मध्ये २० डिसेंबर ते ७ जानेवारी या काळात पंजाबचे रात्रीचे तापमान २ अंशापर्यंत पोचले होते. याहीवेळी तशीच स्थिती निर्माण झाली आहे. सध्याचे तापमान सरासरी दोन अंशापर्यंत राहिले आहे. यात भटिंडा सर्वात थंड ठिकाण राहिले आहे. यावेळीही उणे ०.२ अंशासह राज्यात सर्वात नीचांकी तापमान नोंदले गेले. हरियानातही सहा वर्षातील विक्रम मोडला आहे. येथे किमान तापमान उणे १.२ अंश सेल्सिअस राहिले. हिसार हा देशातील सखल भागातील सर्वात थंड शहर ठरले. तेथे सलग दोन दिवस उणे तापमान राहिल्याने ९ वर्षाचा विक्रम मोडला आहे. यापूर्वी २०११ रोजी पारा उणेपर्यंत घसरला होता. 

हिमाचलमध्ये पर्यटकांची वर्दळ
हिमाचलमध्ये हिमवृष्टीमुळे पर्यटकांची वर्दळ वाढली आहे. कुफ्री, नारकंडाकडे जात आहे. कालही याठिकाणी मोठ्या संख्येने पर्यटक पोचले होते. त्यामुळे हॉटेल आणि पर्यटनाशी निगडीत व्यवसायाला चालना मिळाली आहे. येत्या काही दिवसात  हिमवृष्टी झाल्यास पर्यटकांची संख्या वाढेल, अशी आशा आहे. 

बिहारमध्ये गया सर्वात थंड
उत्तर भारतात पर्वतरांगातून थंड वारे येत असल्याने उत्तर प्रदेशचा काही भाग थंडीच्या कडाक्याखाली सापडला आहे. उत्तर प्रदेशची राजधानी लखनौत ६.८ अंश तापमान नोंदले गेले. हीच थंडी बिहारमध्ये देखील पडली असून तेथे अनेक जिल्ह्यातील तापमानात घसरण होईल, असे हवामान खात्याने सांगितले आहे. गेल्या चोवीस तासात पाटणा आणि गया येथे  तापमानात घसरण झाली. गया येथे ५.६ अंश तापमान नोंदले गेले. पाटण्यात देखील किमान तापमानात १.६ अंशांनी घसरण झाली

संबंधित बातम्या