कोरोनावर पतंजलीचे औषध

Dainik Gomantak
बुधवार, 24 जून 2020

रामदेवबाबांचा शंभर टक्के यशाचा दावा

हरिद्वार

योगगुरू बाबा रामदेव यांच्या पतंजली या संस्थेने आज कोरोना विषाणूच्या संसर्गावर प्रभावी औषध तयार केल्याचा दावा केला. रामदेवबाबा यांनी आज पत्रकार परिषद घेऊन या औषधाच्या निर्मितीचा दावा केला. या औषधाच्या सेवनामुळे कोरोना केवळ सात दिवसांमध्ये बरा होऊ शकतो, कोरोनाच्या रुग्णांवर या औषधाच्या घेण्यात आलेल्या चाचण्यांचे निष्कर्ष शंभर टक्के खरे ठरल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
या दोन्ही औषधांना कोरोनिल आणि श्‍वासारी अशी नावे देण्यात आली असून, देशातील २८० रुग्णांवर या औषधांच्या चाचण्या घेण्यात आल्या होत्या. या चाचण्यांमधून सकारात्मक निष्कर्ष हाती आले आहेत. या औषधाच्या दोन टप्प्यांमध्ये चाचण्या घेण्यात आल्या होत्या. यातील पहिली चाचणी ही क्लिनिकल कंट्रोल स्टडी आणि दुसरी क्लिनिकल कंट्रोल ट्रायल होती. या औषधांच्या निर्मितीसाठी पतंजली संशोधन संस्था, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस आणि निम्स विद्यापीठ, जयपूर या संस्थांनी एकत्र येऊन यासाठी संशोधन केले होते असे रामदेवबाबांनी सांगितले.

औषध म्हणून जाहिरात नको
पतंजलीच्या औषधाच्या दाव्यापासून आयसीएमआर आणि आयुष मंत्रालयाने मात्र हात झटकले आहेत. या संपूर्ण घटकाची पूर्ण पाहणी होत नाही तोवर त्याची कोरोनावरील औषध अशी जाहिरात केली जाऊ नये असे स्पष्ट निर्देश पतंजलीस देण्यात आले. कोरोनावरील उपचारासाठी नेमक्या कोणत्या औषधी घटकांचा वापर करण्यात आला त्याची माहिती सादर करण्याचे निर्देशही पतंजलीस देण्यात आले आहेत. कोरोनाच्या रूग्णांवर नेमक्या कोठे चाचण्या घेण्यात आले त्या स्थळाची माहिती द्या असेही आयुष मंत्रालयाकडून पतंजलीस सांगण्यात आले आहे.
 

संबंधित बातम्या