लाच म्हणून एक किलो पेढे मागणारा पोलिस अधिकारी बडतर्फ

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 30 डिसेंबर 2020

येथील एक सहाय्यक पोलिस उपनिरीक्षकाला लाच म्हणून एक किलो पेढ्यांची मागणी केल्यामुळे निलंबित व्हावे लागले आहे. वाहनांची चौकशी करताना एएसआय भोला राय यांनी ही मागणी केली होती.   

 पाटणा- राज्याची राजधानी असलेल्या पाटणा शहरात एक अजब प्रकरण घडले आहे. येथील एक सहाय्यक पोलिस उपनिरीक्षकाला लाच म्हणून एक किलो पेढ्यांची मागणी केल्यामुळे निलंबित व्हावे लागले आहे. वाहनांची चौकशी करताना एएसआय भोला राय यांनी ही मागणी केली होती.   
 
पाटण्यातील पुनाईचक येथे वाहनांच्या चौकशीदरम्यान एसआय भोला राय यांनी भारतीय  हवाई दलातील एका माजी कर्मचाऱ्याकडे प्रदुषणासंदर्भातील कागदपत्रांबाबत विचारणा केली. या कागदपत्रांची पुर्तता न केल्याने त्यांची लाचेची मागणी केली. मात्र, यात पैशांऐवजी त्यांनी एक किलो पेढ्यांचीच थेट मागणी केली. या प्रकरणाचा व्हिडिओ वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पोहचल्यानंतर संबंधित अधिकाऱ्याला निलंबित व्हावे लागले आहे. हे संपूर्ण प्रकरण छुप्या कॅमेऱ्यात कैद झाले असून हा व्हिडिओ पाटण्यासहित संपूर्ण बिहारमध्येच व्हायरल झाल्याने याची चांगलीच चर्चा होती.  

दरम्यान, हवाई दलातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्याकडे एएसआय भोला राय यांनी १० हजार रूपयांची मागणी केली होती. अखेर त्यांच्यात तडजोड झाल्याने ५०० घेण्याचे भोला याने कबूल केले. मात्र, १० हजारांचा दंड न आकारता फक्त ५०० रूपयांत सोडून दिले म्हणून किमान तोंड तरी गोड करा, असे सांगत भोला यांनी संबंधिताकडे एक किलो पेढ्यांची मागणीही केली. त्यानंतर लाच स्वरूपात एक किलो पेढे मागणाऱ्या या अधिकाऱ्याचा व्हिडिओ छुप्या पद्धतीने शुट केल्याने हे प्रकरण चांगलेच  व्हायरल झाले. यात भोला राय हे दोषी आढळून आल्याने त्यांचे निलंबन करण्यात आले. 

संबंधित बातम्या