पंतप्रधान मोदींनीही स्वीकारला ‘मुदत ठेवींचा’ मार्ग

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 16 ऑक्टोबर 2020

पंतप्रधानांकडील स्थावर जंगम मालमत्तेची मागील वर्षीची किंमत 1 कोटी 39 लाख 10 हजार 260 होती. यावर्षी त्यांच्याकडील संपत्ती 1 कोटी 75 लाख 63 हजार 618 झाली आहे.

नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संपत्तीत मागील आर्थिक वर्षांत 26.26 टक्‍क्‍यांनी वाढ झाल्याचे दिसून आले आहे. 12 ऑक्‍टोबरला प्रसिद्ध झालेल्या माहितीनुसार पंतप्रधानांनी जून 30 पर्यंत राष्ट्रीयकृत बॅंकांतील मुदत ठेवींमध्ये सर्वाधिक बचत केली आहे.

बहुतांश भारतीयांप्रमाणेच मोदींचाही भर मुदत ठेवींवरच आहे. भारतीय पंतप्रधानांचा पगार 2 लाख रुपये महिना आहे. कोरोनामुळे अन्य मंत्री-खासदारांप्रमाणेच यंदा त्यांच्या वेतनातही 20 टक्‍क्‍यांची कपात झाली आहे. 

पंतप्रधानांकडील स्थावर जंगम मालमत्तेची मागील वर्षीची किंमत 1 कोटी 39 लाख 10 हजार 260 होती. यावर्षी त्यांच्याकडील संपत्ती 1 कोटी 75 लाख 63 हजार 618 झाली आहे. गांधीनगरमधील 1 कोटी 10 लाख किमतीचे त्यांचे घर व एक प्लॉट याचे ते अन्य कुटुंबीयांसह एक मालक आहेत. त्यांनी बचतीत पैसे गुंतवताना आयुर्विमा, राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रे (एनएससी) व पायाभूत योजनांसाठीचे सरकारी रोखे यात मुख्यत्वे गुंतवणूक केली आहे. 

सत्तर वर्षीय मोदींनी आपल्या वेतनातून केलेल्या बचतीमुळे त्यांच्या संपत्तीत वाढ दिसत आहे. त्यातही त्यांनी मुदत ठेवींमध्ये सर्वाधिक बचत केल्याचे दिसते. मुख्यत्वे त्यावरील व्याजातूनच त्यांच्या संपत्तीतील वाढ दिसत आहे. मोदींच्या मालकीच्या चल संपत्तीमध्ये मागील वर्षांत कोणतीही वाढ झालेली नाही. त्यातही एनएससीतील गुंतवणुकीतील व्याजाचा त्यांच्या संपत्तीतील वाढीत लक्षणीय वाटा दिसतो. 

संबंधित बातम्या