‘आरोग्य वन’चे मोदींच्या हस्ते उद्‌घाटन

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 31 ऑक्टोबर 2020

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नर्मदा जिल्ह्यातील केवाडिया येथे औषधी वनस्पतींनी भरलेल्या ‘आरोग्य वना’चे उद्‌घाटन केले.

केवाडिया : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नर्मदा जिल्ह्यातील केवाडिया येथे औषधी वनस्पतींनी भरलेल्या ‘आरोग्य वना’चे उद्‌घाटन केले. ‘एकता पुतळ्या’जवळच्या (स्टॅच्यु ऑफ युनिटी) १७ एकर परिसरात विस्तार असलेल्या या वनात मानवी आरोग्य चांगले ठेवण्यात उपयुक्त असणाऱ्या अनेक वनस्पतींचा समावेश 
आहे. 

मोदींच्या हस्ते दोन दिवसांत एकूण १७ प्रकल्पांचे उद्‌घाटन होणार आहे. ३८० निवडक वनस्पती प्रजातींची पाच लाखांहून अधिक झाले या वनात आहेत. या वनात कमळाचे तळे, अल्बा गार्डन, अरोमा गार्डन, योग आणि ध्यानधारणा केंद्र, डिजीटल माहिती केंद्र असेल. 

शिवाय आयुर्वेदिक अन्न पुरविणारा कॅफेटेरियाही येथे असेल. योग, आयुर्वेद आणि ध्यानधारणा यांच्या मानवी आयुष्यात असलेल्या महत्त्वावरही येथे भर देण्यात आला आहे. मोदींनी पर्यटकांना मार्गदर्शन करण्यासाठी नेमलेल्या मार्गदर्शकांशीही संवाद साधला. 

कोरोनाचा संसर्ग सुरु झाल्यापासून पंतप्रधान मोदींचा हा पहिलाच गुजरात दौरा आहे. अहमदाबाद विमानतळावर उतरल्यावर ते गुजरातचे दिवंगत माजी मुख्यमंत्री केशूभाई पटेल यांच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी गेले. त्यांनी मातु:श्री हिराबा यांचीही भेट घेतली.

संबंधित बातम्या