प्रामाणिक प्राप्तिकर भरणाऱ्यांसाठी पंतप्रधानांकडून ‘फेसलेस’ व्यासपीठाचे उद्‌घाटन

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 14 ऑगस्ट 2020

देशाची अर्थव्यवस्था प्राप्तिकरावर चालत असल्याने प्रत्येकाने तो प्रमाणिकपणे भरावा.यातून खुद्द करदात्यांनाही दर्जेदार पायाभूत सुविधा मिळणार आहेत. इतक्‍या मोठ्या लोकसंख्येप्रती आपली जबाबदारी प्रत्येक करदात्याने ओळखली पाहिजे.- नरेंद्र मोदी, पंतप्रधान

नवी दिल्ली: प्राप्तिकर भरण्यातील क्‍लिष्टता टाळून ही प्रक्रिया जास्तीत जास्त पारदर्शक करणे तसेच अधिकाधिक लोकांना कर भरण्यासाठी प्रवृत्त करणे या उद्देशाने सुरू केलेल्या ‘पारदर्शी टॅक्‍स व्यवस्था- प्रामाणिकांचा सन्मान’ ( ट्रान्सपरंट टॅक्सेशन -ऑनरिंग द ऑनेस्ट) या नव्या व्यासपीठाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज उद् घाटन करण्यात आले.  करदात्यांना या माध्यमातून फेसलेस असेसमेंट, टॅक्‍सपेयर्स चार्टर, फेसलेस अपील आदी सुविधा मिळणार आहेत.

 

विशेषतः ‘फेसलेस’ म्हणजे आपले कर प्रकरण दिल्लीपासून गल्लीपर्यंतच्या आयकर भवनांत बसणाऱ्या कोणत्या अधिकाऱ्याकडे आहे हे समजू शकणार नसल्याने (नाव गाव व चेहरा न समजता) करसंकलनाच्या प्रक्रियेतील भ्रष्टाचार कमी होईल असा विश्‍वास सरकारला आहे.

 

‘‘प्रामाणिकपणे कर भरा, हेच मागणे मी स्वातंत्र्यदिनानिमित्त आपल्याकडे मागतो ’’ असे भावनिक आवाहन मोदी यांनी केले. या व्यासपीठाद्वारे  प्राप्तिकर  भरण्यातील तांत्रिक क्‍लिष्टता कमी होऊन नागरिकांना सुलभपणे सेवांचा लाभ घेता येईल. ही नवी योजना येत्या २५ सप्टेंबरपासून (दीनदयाळ उपाध्याय जयंती) देशभरात लागू होणार आहे. २१ व्या शतकातील ही अत्याधुनिक योजना प्रामाणिक करदात्यांसाठी  ‘फेयरनेस’ आणि ‘फियरनेस’ ठरेल असे सांगून पंतप्रधान म्हणाले की मागील सहा-सात वर्षांत कर देशात भरणाऱ्यांच्या संख्येत  सुमारे अडीच कोटींनी वाढ झाली आहे. ही मोठी वाढ असली तरी १३० कोटींच्या आपल्या देशात आजही फक्त दीड कोटी लोकच नियमितपणे प्राप्तिकर भरतात, यावर सर्वांनी चिंतन करणे गरजेचे आहे.

 

अधिकार कर्तव्यात संतुलन

करदात्यांचे अधिकार व कर्तव्ये यात संतुलन आणणे हाच ‘टॅक्‍सपेअर चार्टर’चा अर्थ आहे. दोन दिवसांनी येणाऱ्या स्वातंत्र्यदिनानिमित्त आज मी देशवासीयांना, जे सक्षम आहेत त्यांना आज हाच आग्रह करेन की कर भरण्यातील प्रामाणिकपणा वाढणे हे आत्मनिर्भर भारताच्या लक्षपूर्तीसाठी अत्यावश्‍यक आहे. ही फक्त प्राप्तिकर विभागाची जबाबदारी नसून प्रत्येक भारतीयाची आहे. गेल्या काही वर्षांत प्राप्तिकर भरण्यातील क्‍लिष्टता टाळून व कायद्याचा जाच  कमी करून एक तांत्रिक प्रणाली विकसित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या