बिहार निवडणुकीसाठी मोदींच्या १२ सभांचे आयोजन

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 17 ऑक्टोबर 2020

विकास हाच एनडीएचा मुख्य अजेंडा असल्याचा दावा केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी केला असून यासाठी येत्या २३ ऑक्‍टोबरपासून मोदी हे राज्यात १२ निवडणूक प्रचारसभा करतील. 

नवी दिल्ली-   बिहारच्या रणधुमाळीत भाजप प्रचाराची सूत्रे पंतप्रधान नरेंद्र मोदी आता स्वतःच्या हाती घेणार असून येत्या २३ ऑक्‍टोबरपासून ते राज्यात १२ निवडणूक प्रचारसभा करतील. पक्षाचे निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी ही आज माहिती दिली.

 २८ ऑक्‍टोबरपासून तीन टप्प्यांत निवडणुका होणाऱ्या बिहारमध्ये नितीशकुमार यांचा जदयू व लालूप्रसाद यांचा राजद या दोन्ही आघाड्यांमधील रणधुमाळी रंगात आली आहे. भाजप व कॉंग्रेस तेथे दुय्यम भूमिकेत आहेत. त्यातच कॉंग्रेसने एका जिना समर्थकाला दरभंगा जिल्ह्यातून उमेदवारी दिल्याने तो वादाचा विषय ठरला आहे. 

भाजप आघाडीतून बिहारमध्ये बाहेर पडलेल्या चिराग पासवान यांच्या लोकजनशक्ती पक्षाला भाजपच्या छुप्या मदतीची चर्चा अद्याप थांबलेली नाही. हा संशयकल्लोळ सावरण्यासाठी मोदींच्या प्रत्येक सभेत मुख्यमंत्री नितीशकुमार यांना व्यासपीठावर आमंत्रित करण्यात येणार आहे. एनडीएने आज रिपोर्ट कार्डही जारी केले.  विकास हाच एनडीएचा मुख्य अजेंडा असल्याचा दावा केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी केला.
 

 

संबंधित बातम्या