नरेंद्र मोदींची ‘मन की बात’…….. 

प्रतिनिधी
रविवार, 27 सप्टेंबर 2020

'मन की बात'च्या 69 व्या भागात आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीयांशी संवाद साधला. सुरूवातीलाच परिवारासंबंधी बोलताना ते म्हणाले की, कोरोनाने आपल्याला एकत्र रहायला शिकवले आहे.

दिल्ली: 'मन की बात'च्या 69 व्या भागात आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीयांशी संवाद साधला. सुरूवातीलाच परिवारासंबंधी बोलताना ते म्हणाले की, कोरोनाने आपल्याला एकत्र रहायला शिकवले आहे. तसेच या कोरोनाकाळात काही महत्वपूर्ण बदलही घडले आहेत. त्यामुळे आता परिवाराचे महत्व कळून आले आहे. लॉकडाऊनच्या काळातील एका आठवणीचा  उल्लेखही त्यांनी यावेळी  केला. 

कथा ऐकवण्याच्या कलेसंदर्भात  भाष्य करत ते पुढे म्हणाले की, जेवढी मानवी सभ्यता जुनी  तेवढाच कथांचा इतिहासही जुना आहे.  याबरोबरच त्यांनी हितोपदेश आणि पंचतंत्र कथांचाही उल्लेख केला.  त्यामधून विवेक आणि बुद्धिमत्तेचा संदेश दिला जात असल्याचे ते म्हटले. 

पुढे बोलताना मोदींनी बंगळुरूतील एका स्टोरी टेलिंग ग्रुपला एक कथा ऐकवण्यास सांगितले. राजा कृष्णदेव राय यांच्या या कथेत तेनालीराम यांचा उल्लेख करण्यात आला. आपल्या देशाला लोककलेची मोठी परंपरा लाभली असल्याचेही यावेळी मोदी यांनी म्हटले. याबरोबरच भारतातील 'किस्सागोईची परंपरा' आणि तामिळनाडूमधील 'विल्लू पाट' याबद्दलही विस्तृत माहिती दिली. कोरोनाकाळात नागरिकांनी मास्क घालावे असे आवाहनही त्यांनी यावेळी बोलताना केले. 

 यावेळी त्यांनी सर्जिकल स्ट्राइक बद्दलही भाष्य केले. आमच्या सैनिकांचे धैर्य, शौर्य आणि पराक्रम जगाने पाहिला आहे. आमच्या शूर सैनिकांचे एकच लक्ष होते की, आपल्या मातृभूमीचा  गौरव आणि सन्मान कुठल्याही परिस्थितीत कायम ठेवायचा आहे.

शेतकऱ्यांबाबतही त्यांनी महत्वपूर्ण गोष्ट नमुद करताना त्यांना फक्त फळे, भाज्याच विक्री करण्याची मोकळीक नसून ते भात, गहू, राई, ऊस यांचीही लागवड करून विकू शकतात असे म्हटले. 3-4 वर्षांपूर्वी महाराष्ट्रात फळे, भाज्या एपीएमसीच्या कक्षेतून बाहेर ठेवण्यात आले होते. पण आता हे बदलले असल्याचेही मोदी यांनी यावेळी ‘मन की बात’ मधून स्पष्ट केले.

याआधी 30 ऑगस्टला मन की बात मधून देशातील नागरिकांना मोदी यांनी संबोधित केले होते. त्यावेळी मोदी यांनी आत्मनिर्भर भारत या मुद्द्यावर अधिक जोर दिला होता. तसेच कोरोनाकाळात नागरिकांनी परिस्थितीचे भान ठेवत सण साजरे केले त्याचा सुद्धा त्यांनी उल्लेख केला होता. या व्यतिरिक्त देशातील खेळणी उत्पादन, शिक्षण या मुद्द्यांवरही त्यांनी त्यावेळी भाष्य केले होते.

संबंधित बातम्या