आंदोलक शेतकऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत दिल्लीला जाता येऊ नये यासाठी पोलिसांचे प्रयत्न

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 28 नोव्हेंबर 2020

दिल्लीकडे कूच करणाऱ्या हजारो आंदोलक शेतकऱ्यांना रोखण्यासाठी हरियाना व उत्तर प्रदेश पोलिसांनी केलेले प्रयत्न उधळून लावत हजारो शेतकरी आज दिल्लीच्या सिंघू व टीकरी सीमेवर दाखल झाले.

नवी दिल्ली : दिल्लीकडे कूच करणाऱ्या हजारो आंदोलक शेतकऱ्यांना रोखण्यासाठी हरियाना व उत्तर प्रदेश पोलिसांनी केलेले प्रयत्न उधळून लावत हजारो शेतकरी आज दिल्लीच्या सिंघू व टीकरी सीमेवर दाखल झाले. तेथे त्यांना रोखण्यासाठी दिल्ली पोलिसांचा अफाट फोजफाटा तैनात करण्यात आला होता. तेथे सुरवातीला काटेरी तारांचे अडथळे होते. त्यानंतर दंगलग्रस्त भागासाठी तयार केलेल्या वज्र वाहनासह पोलिसांच्या व अग्निशामक दलाच्या गाड्यांच्या रांगा होत्या. हजारो सशस्त्र पोलिस व निमलष्करी जवान तैनात करण्यात आले होते. सातत्याने ड्रोनद्वारेही शेतकऱ्यांवर नजर ठेवण्यात येत होती.

कृषी कायद्याच्या विरोधात दिल्लीत आंदोलन करण्यासाठी पंजाब, हरियानाचे शेतकरी राजधानीत जाण्यावर ठाम आहेत. दोन दिवसांपासून दिल्लीकडे जाणारे रस्ते अडवल्यामुळे सीमेवर मोठ्या संख्येने शेतकरी जमले. सिंघू सीमेवर दिल्ली पोलिसांनी तीन कड्यात बॅरिकेडस उभारल्याने  शेतकऱ्यांना पुढे जाताना अडचणी आल्या. सर्वात पुढे काटेरी तारांचे आणि त्यानंतर बॅरिकेडसप्रमाणे ट्रक आणि शेवटची कडी वॉटर कॅननची आहे. कोणत्याही स्थितीत आंदोलक दिल्लीला जावू नये, यासाठी पोलिस खबरदारी घेत आहेत. तीन राज्यांच्या पोलिसांनी सीमांची नाकाबंदी केली. मात्र शेतकरी ट्रॅक्टरने पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहेत. 

 

संबंधित बातम्या