Tractor Parade : दिल्ली सीमेवर अभूतपूर्व गोंधळ; शेतकरी-पोलिसांमध्ये संघर्ष

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 26 जानेवारी 2021

प्रजासत्ताक दिनानिमित्तानं राजपथावर परेड सुरु असतानाच, यानंतर  नव्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करणारे शेतकरी आज दिल्लीत ट्रॅक्टर परेड काढणार आहेत.

नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनानिमित्त राजपथावर परेड सुरु असतानाच, यानंतर  नव्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करणारे शेतकरी आज दिल्लीत ट्रॅक्टर परेड काढणार आहेत. ही परेड सिंघु बॉर्डर, टिकरी आणि गाजीपुर मार्गे जाईल. सुप्रीम कोर्टाने याबाबात दिल्ली पोलिसांना निर्णय घेण्यास सांगितले होते. दिल्ली पोलिसांनी या मोर्चाला परवानगी दिली आहे. काही अनुचित प्रकार घडू नये याकरिता दिल्ली सीमेवर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दिल्लीकडे निघालेल्या शेतकऱ्यांनी पोलिसांचे बॅरिकेड्टस तोडले आहेत.

शेतकरी रिंगरोडच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न करत असून, पोलिस त्यांना आडवत आहेत.नोएडा सीमेवर शेतकऱ्यांनी बॅरिकेड्स तोडल्याने पोलिसांनी अश्रुधुराचा केला वापर सिंघू बॉर्डरवर पोलिस आणि शेतकऱ्यांमध्ये संघर्ष सुरु आहे. मुबारका चौकात पोलिसांवर दगडफेक करण्यात आली, त्यामुळे लाठीचारासह अश्रुधुराचा वापर केरण्यात आला.आंदोलक शेतकऱ्यांनी दिल्ली-हरयाणाच्या टिकरी बॉर्डरवरचे पोलिस बॅरिकेडींग तोडले आहेत. सिंघू बॉर्डरवरील बॅरिकेड्स तोडून शेतकरी ट्रॅक्टरवरुन पुढे जात आहेत. कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी या परेडच्या आयोजनावर टीका करत ते म्हणाले, “शेतकऱ्यांना 26 जानेवारी ऐवजी इतर कोणत्याही दिवसाची निवड करता आली असती, परंतु त्यांनी हाच दिवस निवडला. शेतकर्‍यांची ही रॅली शांततेत पार पडेल, याची काळजी त्यांनी घ्यायला हवी. कारण पोलिस प्रशासनासाठी देखील चिंताजनक बाब आहे.”

पोलिसांकडून नांगलोईमध्ये रस्ते ब्लॉक करण्यात आले आहेत. शेतकऱ्यांनी मध्य दिल्लीत प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्यास, त्यांच्याविरुद्ध कारवाई केली जाणार आहे. राजपथावर प्रजासत्ताक दिनाचे संचलन झाल्यानंतर ट्रॅक्टर संचलनाला सुरवात होईल, असे दिल्ली पोलिसांनी सांगितले. मात्र, यानिमित्ताने दहशतवादी कारवाया घडविण्यासाठी पाकिस्तानातील दहशतवादी गटांचे ट्रॅक्टर मोर्चावर विशेष लक्ष असल्याचा इशाराही दिल्ली पोलिसांनी दिला आहे. यासाठी सुरक्षा यंत्रणांना अतिदक्षतेचेही आदेश देण्यात आले आहेत. शेतकरी संघटनांनी दिल्लीच्या आऊटर रिंगरोडवर संचलनाच्या परवानगीची मागणी केली होती. परंतु पोलिसांनी सुरक्षेचे कारण देत नकार दिल्यानंतर सिंघू, टिकरी आणि गाजीपूर अशा तीन सीमांवरून हे संचलन सुरु होऊन त्याच ठिकाणी परत येणार आहे. ट्रॅक्टर संचलनासंदर्भात पोलिसांशी झालेल्या वाटाघाटीनंतर संयुक्त किसान मोर्चाचा प्रमुख चेहरा व स्वराज इंडियाचे नेते योगेंद्र यादव यांनी पत्रकारांशी बोलताना शेतकऱ्यांचे ट्रॅक्टर संचलन पूर्णपणे शांततेत असेल, असे स्पष्ट केले आहे.

 

 

 

 

 

 

संबंधित बातम्या