देशातील राजकारणात बदल होतोय : शरद पवार

देशातील राजकारणात बदल होतोय : शरद पवार
politics in the country is slowly changing Sharad pawar

पुणे: ‘‘बिहारमधील निवडणूक तेजस्वी यादव विरुद्ध भाजप अशी होती. भाजपची केंद्रात सत्ता आहे. त्यामुळे पूर्ण ताकदीने ते या निवडणुकीत उतरले. वयाने तरुण असलेल्या यादव यांना बहुमत मिळाले नसले तरी देशातील राजकारणात हळूहळू बदल होत आहे. तमिळनाडूच्या निवडणुकीवर बिहारमुळे काही परिणाम होईल असे वाटत नाही,’’ असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले.


हडपसर येथील अमनोरा टाऊनशिपमधील छत्रभूज नरसी या आयबी व केंब्रिज पॅटर्न असलेल्या शाळेचे भूमिपूजन शरद पवार आणि पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते मंगळवारी पार पडले. या वेळी पवार बोलत होते. याप्रसंगी अमनोरा सिटी कॉर्पोरेशन लि.चे व्यवस्थापकीय संचालक अनिरुद्ध देशपांडे, नरसी मोनजी शिक्षण संस्थेचे व्यवस्थापकीय विश्‍वस्त जयराज ठक्कर, आमदार चेतन तुपे आदी उपस्थित होते.


पवार म्हणाले, ‘‘कोरोनानंतर नजीकच्या काळात शाळांमध्ये असणाऱ्या सोयी-सुविधांमध्ये काही प्रमाणात बदल होणार आहेत हे गृहीत धरून आपण सर्वांनीच तयार रहायला हवे. यासाठी केंद्र व राज्य सरकार यांनी दिलेल्या सूचनांचे पालन करणे गरजेचे आहे.’’ छत्रभूज नरसी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ या शाळेची उभारणी होत असताना त्यांचे स्मरण करायला हवे. व्यवसायात आलेल्या यशाचा उपयोग स्वत:साठी न करता त्यांनी आपली संपत्ती समाजासाठी शैक्षणिक संस्था उभारण्यासाठी वापरली ही मोठी बाब आहे, असेही पवार म्हणाले.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com