देशाची शक्ती आणि विज्ञानावर विश्वास - उपराष्ट्रपती

The power of the country and faith in science - Vice President
The power of the country and faith in science - Vice President

नवी दिल्‍ली,

संपूर्ण देशभर कोविड-19 महामारीचा उद्रेक लक्षात घेवून उपराष्ट्रपती व्यकंय्या नायडू यांनी सर्व जनतेला आवाहन केले आहे. या महामारीच्या विरोधात सर्वजण संघटित होवून स्वतः जगताना इतरांच्या रक्षणासाठीही लढा देवू या, असे नायडू यांनी म्हटले आहे.

आता जवळपास संपूर्ण देशभरातून टाळेबंदी मागे घेण्यात आली आहे. अर्थव्यवस्था आता कशी वेगाने सुधारू शकेल, यासाठी सरकार सातत्याने उपाय योजना करीत आहे तसेच प्रत्येकाने यासाठी सरकारला कशी मदत होवू शकेल, याकडे लक्ष दिले पाहिजे. अशा साथीच्या काळात सर्वांनी आवश्यक ती काळजी घेवून सरकारने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी प्रत्येकाने केली पाहिजे. असे मत उपराष्ट्रपतींनी आज फेसबुक पोस्टच्या माध्यमातून व्यक्त केले आहे.

देशापुढे सध्या निर्माण झालेल्या आरोग्य समस्येतून बाहेर पडण्यासाठी आणि या महामारीच्या विरोधात लढण्यासाठी सर्वांनी संघटित प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे, असे नायडू यांनी म्हटले आहे. आपल्या देशाला लाभलेला आध्यात्माचा वारसा ही आपली शक्ती आहे आणि आपण विज्ञानावर विश्वास ठेवतो, हेही महत्वाचे आहे.

लोकांनी अशा काळात मन अस्वस्थ करणारे ‘पॅनिक’चे बटण दाबू नये. मात्र ‘प्रतिबंधात्मक’ उपाय योजनेचे आणि ‘संरक्षणात्मक’ काम करण्याचे बटण जरूर दाबावे, असे आवाहन नायडू यांनी जनतेला केले आहे.

कोविड-19 या आजाराला दूर ठेवण्यासाठी खबरदारीचे उपाय योजणे, हाच पर्याय आहे. म्हणूनच सर्वांनी काही सोप्या सोप्या गोष्टी करण्याचा सराव केला पाहिजे. काही सवयी सर्वांच्या अंगवळणी पडल्या पाहिजेत. यामध्ये चेह-यावर मास्क लावणे, लोकांमध्ये वावरताना सुरक्षित अंतर राखणे आणि वारंवार हात धुणे यामुळे आपण सर्वजण सुरक्षित राहणार आहोत, असे नायडू यांनी नमूद केले.

या उपाय योजनांबरोबरच आपण सर्वांनी पारंपरिक आहार आणि वनौषधी तसेच आयुर्वेदिक गुणधर्म असलेल्या वनस्पतींचा, मसाले यांचा काढा यांचे सेवन करून आपली प्रतिकारशक्ती वाढवावी, असेही नायडू यांनी सूचविले आहे.

उपराष्ट्रपती नायडू यांनी योग आणि ध्यान यांचे महत्व अधोरेखित केले आहे. ‘‘योग, प्राणायाम आणि नियमित व्यायाम या गोष्टी घरामध्ये राहून करता येण्याजोग्या आहेत. यामुळे आपल्या शरीरात विषाणूबरोबर लढा देण्याची शक्ती निर्माण होवू शकणार आहे.’’ असेही नायडू यांनी नमूद केले आहे.

अनेक लोकांच्या आयुष्यात या साथीच्या रोगाने अनिश्चितता निर्माण झाली आहे आणि अनेक प्रकारच्या चिंता त्यांना त्रास देत आहेत. परंतु लोकांनी चिंता करू नये, त्याने काही साध्य होणार नाही. अनेक गोष्टी आपल्या मनावर अवलंबून असतात.....म्हणून आपण आपल्या चिंता कशा कमी होतील, हे शोधले पाहिजे, असा सल्ला त्यांनी यावेळी दिला.

सर्वांनी आपल्या कुटुंबियांबरोबर आणि स्नेही, मित्रपरिवार यांच्या कायम संपर्कात रहावे, यासाठी आभासी तंत्रज्ञानाचा वापर करावा, यामुळे एकत्रित असल्याची भावना निर्माण होवून मन आनंदी होईल, असे नायडू यांनी म्हटले आहे.

या काळात जर कोणाला अजूनही मोकळा वेळ मिळत असेल तर संगीत, ललित कला, साहित्य, पाककला तसेच एखादी नवीन भाषा शिकण्यासाठी त्यावेळेचा सदुपयोग करावा. अशी वेेळेची गुंतवणूक लाभदायक ठरेल आणि यातूनच आपल्याला आनंद देणा-या कामाचा शोध लागेल, असेही नायडू यांनी म्हटले आहे.

खळबळजनक बातम्या आणि समाज माध्यमांवर प्रसारित होणारी माहिती यांनी कोणीही घाबरून जावू नये असे आवाहन नायडू यांनी केले आहे. मात्र प्रत्यक्षात जे घडत आहे, त्या परिस्थितीचा स्वीकार करण्याची सवय आपल्या मनाला लावून घेण्याची आवश्यकता आहे. त्याचबरोबर स्वतःचे आणि आपल्या कुटुंबियांचे संरक्षण करण्यासाठी कठोर होवून कार्यरत राहण्याची गरज आहे. कोणत्याही माहितीची खातरजमा केल्याशिवाय कोणीही विनाकारण घाबरून जावू नये, असेही नायडू यांनी सांगितले आहे.

अशा काळात सर्वांनी भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला दिलेल्या सल्ल्याचे स्मरण करावे. आपल्या हातात फक्त कर्म करणेच असते. मात्र जे काही कर्म करायचे आहे, ते उत्तमतेने पार पाडावे, असा श्रीकृष्णाने दिलेला सल्ला आपल्यालाही लागू होतो, असे नायडू यांनी म्हटले आहे.

आध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर यांच्या उद्गारांचा उल्लेख करून नायडू यांनी लिहिले आहे की, आपले शरीर हाच आपला ख-या जीवनातला भागीदार आहे. म्हणून सर्वांनी आपल्या शरीराची सर्वतोपरी काळजी घ्यावी. त्यासाठी  योग्य भोजन घ्यावे  आणि शारीरिक व्यायाम करून शरीर तंदुरूस्त ठेवावे. आपल्या शरीराने साथ दिली तरच आपण या रोगाशी लढा देवू शकणार आहे.

आता यापुढे नेमके किती काळ अशी मर्यादित आणि बंधनकारक जीवनशैलीमध्ये जगावे लागेल, याचे उत्तर सध्यातरी कोणीही देवू शकत नाही. या प्रश्नाला सोपे आणि निश्चित उत्तर आत्ता मिळू शकत नाही. या साथीचा प्रसार देशातच नाही तर अवघ्या खंडामध्ये झालेला आहे. यावर अद्याप तरी प्रभावी औषध नाही, त्यामुळे आपण स्वतःची प्रतिकारशक्ती वाढवणे गरजेचे आहे. असेही नायडू यांनी नमूद केले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com