प्रधानमंत्री किसान संपदा योजना; २७ प्रकल्पांना मंजुरी

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 2 सप्टेंबर 2020

नवीन एकात्मिक शीतगृह शृंखला प्रकल्पांमुळे १६ हजार २०० शेतकऱ्यांना प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्याची शक्यता असून त्याचा २ लाख ५७ हजार ९०४ शेतकरी बांधवांना लाभ होण्याची शक्यता आहे

नवी दिल्ली:  नवीन एकात्मिक शीतगृह शृंखला प्रकल्पांमुळे १६ हजार २०० शेतकऱ्यांना प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्याची शक्यता असून त्याचा २ लाख ५७ हजार ९०४ शेतकरी बांधवांना लाभ होण्याची शक्यता आहे, अशी माहिती केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री हरसिमरत कौर बादल यांनी दिली आहे. प्रधानमंत्री किसान संपदा योजनेअंतर्गत (पीएमकेएसवाय) एकात्मिक शीतगृह शृंखला आणि मूल्यवर्धित पायाभूत सुविधा याविषयी चर्चा करण्यासाठी व्हिडिओ काॅन्फरन्सच्या माध्यमातून बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीचे अध्यक्षस्थान हरसिमरत कौर बादल यांनी भूषविले.
 
नाशवंत माल टिकवून, त्याची साठवणूक करण्यासाठी पुरेशा पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्यामुळे केवळ शेतकरी बांधवांचे उत्पन्न वाढण्यास मदत होणार नाही, तर फळे, भाजीपाला क्षेत्रामध्ये देश आत्मनिर्भर होण्याच्या दिशेने एक पाऊल टाकणार आहे, असे हरसिमरत कौर बादल म्हणाल्या. या एकात्मिक  शीतगृह शृंखला प्रकल्पांमुळे अन्नप्रक्रिया उद्योगाच्या वाढीला मोठी चालना मिळू शकणार आहे, त्याचबरोबर कृषी पुरवठा साखळी सुलभ होण्यास मदत मिळणार आहे. ग्रामीण भागामध्ये प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी निर्माण होवू शकणार आहेत. शेतक-यांना त्यांच्या मालाला चांगली किंमत मिळण्यास मदत होणार आहे. अंतिम वापरकर्ते आणि सर्व क्षेत्राला लाभ मिळणार आहे. आर्थिक सुरक्षेसाठी हे लाभ अतिशय महत्वपूर्ण आहेत, असेही बादल यांनी सांगितले. 

प्रधानमंत्री किसान संपदा योजनेअंतर्गत २७ प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे. यामध्ये आंध्र प्रदेश (७), बिहार (१), गुजरात (२), हरियाणा (४), कर्नाटक (३), केरळ (१), मध्य प्रदेश (१), पंजाब (१), राजस्थान (२), तामिळनाडू (४), आणि उत्तर प्रदेश (१), यांचा समावेश आहे. या नवीन शीतगृह शृंखला प्रकल्पांमध्ये अन्नप्रक्रियेसाठी आधुनिक आणि नाविन्यपूर्ण पायाभूत सुविधा असणार आहेत. यासाठी एकूण 743 कोटी रुपये गुंतवणूक करण्यात येत आहे. अन्न पुरवठा साखळी कार्यक्षम करून यामध्ये शाश्वत विकास घडवून आणण्यासाठी या शीतगृहांची मदत होणार आहे.

संबंधित बातम्या