माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी अनंतात विलीन

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 2 सप्टेंबर 2020

प्रणव मुखर्जी यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी त्यांच्या दिल्लीतील १० राजाजी मार्ग येथील निवासस्थानी ठेवले होते. राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सकाळी घरी जाऊन मुखर्जी यांना अभिवादन केले.

नवी दिल्ली: माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी (८४ वर्षे) यांच्या पार्थिवावर मंगळवारी दुपारी लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्‍यांना कोरोनाचा संसर्ग झाल्‍याने लष्कराच्या रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचे सोमवारी निधन झाले होते. मुखर्जी यांच्या निधनामुळं केंद्र सरकारने देशात सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे.

प्रणव मुखर्जी यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी त्यांच्या दिल्लीतील १० राजाजी मार्ग येथील निवासस्थानी ठेवले होते. राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सकाळी घरी जाऊन मुखर्जी यांना अभिवादन केले. तसेच उपराष्ट्रपती व्‍यंकय्या नायडू, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपीन रावत आणि तिन्ही सैन्य दलांच्या प्रमुखांनी प्रणव मुखर्जी यांचे अंत्यदर्शन घेतले. 

कोविड-१९ च्या प्रोटोकॉलनुसार, माजी राष्ट्रपतींचे पार्थिव अंत्यसंस्कारांसाठी गन कॅरेजऐवजी शववाहिकेतून लोधी रोड येथील स्मशानभूमीत नेण्यात आले. त्यानंतर येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, देशात सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आल्याने सर्व सार्वजनिक इमारतींवर राष्ट्रध्वज अर्ध्यावर फडकवण्यात येणार आहे.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या