गेली वर्षीची राखी ठरली शेवटची

प्रतिभा पाटील, माजी राष्ट्रपती
मंगळवार, 1 सप्टेंबर 2020

भारतीय राजकारणात पाच दशकांपासून सक्रिय असणारे प्रणव मुखर्जी यांची राष्ट्रपतीपदी निवड होणे, हा त्यांच्या कारर्किदीचा सर्वोच्च सन्मान होता. त्यांची कार्य कुशलता, व्यूहरचनात्मकता, वरिष्ठ वर्तुळात वावरणे यामुळे त्यांना ‘मॅन ऑफ ऑल सिझन’ असे म्हटले जायचे.

प्रणव मुखर्जी गेल्याने खूप दुःख झाले. त्यांचा आणि माझा खूप जवळचा संबंध होता. जेव्हा इंदिरा गांधी यांची सत्ता गेली त्या वेळी आम्ही बरोबर काम केले होते. त्या वेळी काँग्रेस विरोधी पक्षात होता. मी महाराष्ट्रात विरोधी पक्ष नेता होते. त्या वेळी ते महाराष्ट्रात अनेकदा येत. तेव्हापासून खूप चांगले संबंध निर्माण झाले होते. पुढे मी दिल्लीला गेले. आम्ही तेथे काँग्रेस कार्यकारिणीचे सदस्य होतो. या व्यतिरिक्त माझा त्यांचा खूप नजीकचा संबंध म्हणजे मी त्यांना दर वर्षी राखी बांधत असे. ते राष्ट्रपती झाले तेव्हा आणि त्याच्या आधीही दरवर्षी माझी राखी त्यांना पोचत असे. यंदा मात्र कोरोनामुळे ती पाठवता आली नाही. पण, त्यांचा न चुकता फोन आला. ‘स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्या,’ असा संवाद झाला. 

प्रणवदांबरोबर कौटुंबीक आठवण
प्रणवदांची १९७९ मधील गोष्ट आजही मला स्पष्ट आठवते. माझ्याकडे विरोधी पक्षनेते पद होते. त्यावेळी ते आमच्या घरी आले होते. माझा मुलगा पडद्याआडून त्यांच्याकडे बघत होता. त्यांनी मुलाला बोलवले. तो लाजून त्या वेळी पुढे आला नाही. पण, मी राष्ट्रपती झाल्यावर ते मला भेटायला आले. त्या वेळी मुलगा माझ्याबरोबर होता. प्रणवदांनी त्याला बरोबर ओळखले आणि म्हटले ‘मी घरी आलेलो असताना मागे लपणारा हाच ना तो.’ असे म्हणत त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. 

देशाची नस अचूक ओळखणारे नेते
प्रणवदा गेल्याने देशाचे खूप नुकसान झाले आहे. ते विचारवंत होते. धोरणी राजकारणी होते. देशाची नस अचूक ओळखणारे जाणते नेते होते. सगळ्या राजकारण्यांना देशाचे प्रश्न माहिती असतातच असे नाही. आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक अशा सगळ्या विषयांची त्यांना जाण होती. त्यामुळे त्यांच्या जाण्याने देशाचा एक मोठा नेता हरपला. देशाच्या आर्थिक विकासाला त्यातून दिशा मिळाली. पुण्यात स्थायिक झाल्यावर दिल्लीला फारसे जाणे झाली नाही. पण, आमच्या नात्यातले अंतर कधीच कमी झाले नाही.

प्रणवकुमार मुखर्जी
ब्रिटिश भारतातील मिराती खेड्यात (आजचा बिरभूम जिल्हा) प्रणव मुखर्जींचा कामदा किंकर मुखर्जी आणि आई राजलक्ष्मी यांच्या पोटी जन्म झाला. कामदा किंकर मुखर्जी हे देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत सक्रिय होते, १९५२-६४ या काळात ते पश्चिम बंगाल विधान परिषदेचे सदस्य होते, अखिल भारतीय काँग्रेसचे प्रतिनिधी आणि सदस्य होते. सुरी येथील सुरी विद्यासागर महाविद्यालयात प्रणव मुखर्जींनी शिक्षण घेतले, त्यानंतर त्यांनी राज्यशास्त्र आणि इतिहासात एमएची पदवी मिळवली, मग ते एलएलबीदेखील झाले. दोन्हीही पदव्या त्यांनी कोलकत्ता विद्यापीठातून घेतल्या. टपाल खाते व महाविद्यालयात नोकरी केल्यानंतर त्यांनी ‘देशेर डाक’ या नियतकालिकासाठी पत्रकारिता केली. मग ते राजकारणात उतरले.

जन्म : ११ डिसेंबर १९३५
मृत्यू : ३१ ऑगस्ट २०२०
जन्मठिकाण : मिराती, जि. बीरभूम, पश्चिम बंगाल.
शिक्षण : एमए (इतिहास), एमए (राज्यशास्त्र), एलएलबी, डी. लिट (होनोरीस काँजा), सुरी येथील विद्यासागर महाविद्यालय, कोलकता विद्यापीठ, पश्चिम बंगाल.
पत्नी : शुभ्रा, उभयतांना २ मुले आणि मुलगी.
भारताचे तेरावे राष्ट्रपती : कालावधी २५ जून २०१२ ते २५ जुलै २०१७

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या