अकरावी ‘सीईटी’साठी महत्त्वाचे कानमंत्र

अकरावी प्रवेशासाठी राज्यात ‘सीईटी’ होणार आहे. या परीक्षेची वैशिष्ट्ये लक्षात घेऊन कशी तयारी करायची, याचे मार्गदर्शन.
अकरावी प्रवेशासाठी राज्यात ‘सीईटी’ होणार आहे.
अकरावी प्रवेशासाठी राज्यात ‘सीईटी’ होणार आहे.Dainik Gomantak

‘कोविड 19’च्या पार्श्‍वभूमीवर दहावीची पारंपरिक परीक्षा रद्द झाली आणि मूल्यमापनासाठी ठरवलेल्या सुधारित पद्धतीनुसार निकाल जाहीर झाला. अकरावी प्रवेशासाठी राज्यात ‘सीईटी’ होणार आहे. या परीक्षेची वैशिष्ट्ये लक्षात घेऊन कशी तयारी करायची, याचे मार्गदर्शन.

..................................................................

अकरावी प्रवेशासाठी राज्यात सामाईक प्रवेश परीक्षा (‘सीईटी’) होणार आहे. या परीक्षेची वैशिष्ट्ये विद्यार्थ्यांनी प्रथम लक्षात घ्यावीत आणि त्यानुसार तयारी आणि नियोजन करावे, ही वैशिष्ट्ये अशी आहेत.

- इंग्रजी, गणित, विज्ञान आणि सामाजिकशास्त्रे या चार विषयांवर आधारित परीक्षा असेल.

- प्रत्येक विषयासाठी २५ गुण निर्धारित..

- एकूण शंभर गुणांची (ऑफलाइन) परीक्षा. कालावधी दोन तास.

- वस्तुनिष्ठ बहुपर्यायी पद्धत असेल. ऑप्लिकल मार्क रिडर (ओएमआर) पद्धतीने प्रश्नपत्रिका सोडवावी लागेल.

- परीक्षा शनिवार, २१ ऑगस्ट २०२१ रोजी सकाळी अकरा ते दुपारी एक या कालावधीत होईल.

- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्या दहावीच्या नियोजित अभ्यासक्रमाच्या पाठ्यपुस्तकावर आधारित प्रश्न विचारले जातील. मागील वर्षी वगळलेल्या २५टक्के भागावर प्रश्न विचारले जाणार नाहीत.

या प्रमुख वैशिष्ट्यांसह इतरही बाबींची नोंद घ्यायला हवी. प्रश्नपत्रिका आठ माध्यमांतून उपलब्ध असेल. इंग्रजी/ मराठी /गुजराती/ कन्नड/ उर्दू /सिंधी/ तेलुगू आणि हिंदी हे पर्याय उपलब्ध आहेत. परीक्षेचे अर्ज भरण्यासाठी लिंक बोर्डामार्फत उपलब्ध करून दिली आहे. राज्य मंडळाच्या २०२१च्या विद्यार्थ्यांसाठी फक्त परीक्षा क्रमांक नोंदविल्यावर सर्व माहिती संगणक प्रणालीमार्फत उपलब्ध होईल. सूचना वाचून ‘होय’ हा पर्याय निवडल्यावर त्याचे आवेदन पत्र भरण्याची प्रक्रिया संपेल.

अन्य मंडळामार्फत, तसेच राज्य मंडळामार्फत २०२१पूर्वी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या अथवा प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांसाठी...

- विद्यार्थ्यांनी संगणक प्रणालीमधील सर्व माहिती काळजीपूर्वक भरायची आहे. योग्य ते माध्यम निवडायचे आहे. परीक्षा देण्यासाठी केंद्र निश्चित करण्यासाठी त्याच्या तात्पुरत्या अथवा कायमच्या पत्त्याची नोंद करावी. त्यानुसार, केंद्र देण्यात येईल. या सोबतच ओळखपत्रासाठी पासपोर्ट आकाराचे फोटो आणि स्वाक्षरी नमुना संगणक प्रणालीत अपलोड करणे आवश्यक आहे.

- दिव्यांग विद्यार्थ्यांनी आवेदन पत्र दिव्यांग प्रकार निवडून त्याबाबतचे आवश्यक कागदपत्रे अपलोड करावेत.

- राज्य मंडळाच्या २०२१ची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना कोणतेही परीक्षा शुल्क भरावे लागणार नाही.

- अन्य मंडळांच्या विद्यार्थ्यांना १७८ रुपये शुल्क दिलेल्या पर्यायाद्वारे ऑनलाइन भरावे लागेल. विद्यार्थ्यांना प्रवेश पत्र ऑनलाइन पद्धतीने उपलब्ध होईल ते डाऊनलोड करून त्याची प्रिंट घ्यावी आणि त्यावरील सूचना काळजीपूर्वक वाचून केंद्रावर उपस्थित राहावे.

- दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करून मागणीनुसार लेखनिक किंवा जादा वेळेची सवलत दिली जाईल. त्यासाठी आवश्यक प्रमाणपत्रांची पडताळणी केली जाईल.

प्रत्यक्ष केंद्रावर उत्तरपत्रिका सोडवताना...

- प्रश्नपत्रिका व ‘ओएमआर’ पद्धतीची उत्तर पत्रिका असेल, त्यावर १ ते १०० प्रश्नांची उत्तरे नोंदवण्यासाठी प्रत्येक प्रश्न क्रमांकासमोर A/B/C/D असे चार प्रकाराचे गोल देण्यात आलेले आहेत.

- त्यांपैकी एकच गोल काळ्या किंवा निळ्या शाईच्या बॉलपेनने ठळकपणे भरावा. योग्य पर्याय उत्तराचा वर्ण अक्षराचा गोल पूर्णपणे भरेल याची दक्षता घ्यावी. अर्धवट भरलेला, खाडाखोड केलेला, एकापेक्षा जास्त गोल भरले असा प्रकार आढळल्यास ती उत्तरे तपासणीसाठी ग्राह्य धरले जाणार नाहीत आणि त्याला गुणदान होणार नाही. एकदा लिहिलेले उत्तर बदलता येणार नाही.

- उत्तरांची तपासणी संगणकीय पद्धतीने होणार असल्याने उत्तरपत्रिकेची घडी करणे किंवा चुरगाळणे अशा कोणत्याही कारणाने उत्तरपत्रिका खराब होणार नाही याची काळजी घ्यावी.

- काही कच्चे काम करण्यासाठी प्रश्नपत्रिकेच्या शेवटी कोरी जागा दिली जाईल.

- उत्तर पत्रिकेसोबतच त्याची कार्बन प्रत असेल. ती परीक्षा झाल्यानंतर विद्यार्थ्याला उपलब्ध होईल. मंडळाच्या संकेतस्थळावर दिलेल्या अंतिम सूचीनुसार त्याला स्वतःच्या गुणांचा अंदाज पाहता येईल.

- राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांना ही पाठ्यपुस्तके परिचित असल्याने त्यांनी दिनांक १९ रोजी प्रसिद्ध झालेल्या परिपत्रकानुसार चार विषयांचे घटक व उपघटक यांची उजळणी करावी.

सीबीएसई आणि आयसीएसई विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे

१) अभ्यासक्रम महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांनी प्रसिद्ध केलेल्या पाठ्यपुस्तकातील असला, तरी गणित आणि विज्ञान यातील मूलभूत संकल्पना, नियम, सूत्रे, व्याख्या हे सर्वत्र सारखेच आहेत .

२) इंग्रजी भाषेतील व्याकरणाचे निगडीत ३१ घटकांची यादी परिपत्रकात स्पष्ट दिलेली आहे, याशिवाय सहा ते आठ ओळींचा एखादा उतारा आणि त्यावर आधारित प्रश्न, तसेच Poetic devices आणि Questions based on writing skills या सर्वांचा समावेश इंग्रजीच्या २५ प्रश्न प्रकारात असेल.

३) विज्ञान आणि तंत्रज्ञान या विभागात पाठ्यपुस्तकानुसार जीवशास्त्र, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि पर्यावरण या सर्वांवर प्रश्न असतील.

४) गणित विभागात बीजगणित आणि भूमिती या दोन्ही घटकांचा समावेश असेल.

५) सामाजिकशास्त्रे यामध्ये इतिहास राज्यशास्त्र आणि भूगोल या तीन उपघटकांवर आधारित प्रश्न असतील.

५) ई-बालभारतीच्या माध्यमातून दहावीच्या राज्य मंडळाची पाठ्यपुस्तके पीडीएफ स्वरूपात उपलब्ध होतील, तसेच फ्लिप बुक स्वरूपातही उपलब्ध आहेत. त्यानुसार तयारी करणे अपेक्षित आहे.

सर्वांसाठी महत्त्वाचे...

  • एकशे वीस मिनिटात शंभर प्रश्न सोडवणे यासाठी वेळेचे नियोजन अत्यंत आवश्यक आहे.

  • प्रश्नपत्रिकेत सोपे, मध्यम आणि कठीण असे सर्व प्रकारचे प्रश्न असतील. म्हणूनच पहिल्या फेरीत सोपे प्रश्न, ज्यांच्या उत्तराबद्दल शंभर टक्के खात्री आहे अशा प्रश्नांची उत्तरे पर्याय गोल भरीव करावेत. त्यानंतर काठिण्यपातळीनुसार मध्यम स्वरूपाचे प्रश्न आणि शेवटी कठीण स्तराचे प्रश्न असा क्रम ठेवावा.

  • उत्तर देताना पूर्ण खात्री झाल्याशिवाय उत्तर देऊ नये, कारण दुरुस्तीला परवानगी नाही.

  • या परीक्षा पद्धतीत निगेटिव्ह मार्किंग नाही, त्यामुळे अगदी शेवटच्या टप्प्यात राहिलेले प्रश्नांचे तुमच्या अंदाजानुसार योग्य पर्याय निश्चित करावेत.

  • उपलब्ध वेळेचे नियोजन करून नियोजनबद्ध अभ्यास आणि त्याची उजळणी करून परीक्षेसाठी सिद्ध व्हा, पाठ्यपुस्तकाचे काळजीपूर्वक वाचन करताना त्यातील नियम सूत्रे व्याख्या आणि मूलभूत संकल्पना यांचा विचार करा.

  • विज्ञान विभागात गणितावर आधारित काही प्रश्न विचारले जाऊ शकतात, पाठात आलेली उदाहरणे किंवा पाठाखालील स्वाध्याय यांमध्ये वेगवेगळ्या स्वरूपात विचारलेल्या प्रश्नांवर देखील बहुपर्यायी स्वरूपात प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यामुळे पाठ्यपुस्तकाचा बारकाईने अभ्यास हाच या परीक्षेसाठी कानमंत्र आहे.

-महेंद्र गणपुले

(लेखक ज्येष्ठ मुख्याध्यापक व मूल्यमापन अभ्यासक आहेत.)

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com