बिहार एनडीएतील घटक पक्षांत कुरबुर

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 14 ऑगस्ट 2020

एकवाक्यता नसताना निवडणुकीची तयारी सुरू

 बिहारमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील (एनडीए) नेत्यांमध्ये एकवाक्यता नसल्याचे दिसून येत आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. त्याचवेळी आघाडीचा घटक पक्ष असलेल्या लोक जनशक्ती पक्षाचे (एलजेपी) अध्यक्ष रामविलास पासवान यांनी कोरोनामुळे निवडणूक काही दिवस पुढे ढकलावी, असे मत व्यक्त केले आहे.

बिहारमधील विरोधी पक्षांनी निवडणूक पुढे ढकलण्याची मागणी यापूर्वीच केली आहे. २४३ आमदार असलेल्या बिहार विधानसभेचा कार्यकाळ २४ नोव्हेंबरला समाप्त होत आहे. त्याआधी निवडणूक झाली नाही तर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी लागणार आहे. 

नितीश कुमार यांचा संयुक्त जनता दल (जेडीयू) हा पक्ष नियोजित वेळी निवडणूक घेण्याच्या बाजूने आहे. निवडणूक वेळेत होतील असे प्रारंभी सांगणारा भाजपने आता याबाबत बोलणे बंद केले आहे. यामुळे बिहारमध्ये पेचप्रसंग निर्माण झाला आहे. 

चिराग पासवान यांच्याकडून सरकारची कोंडी
राज्यातील वेगवेगळ्या मुद्यांवरुन पासवान व त्यांचे पुत्र चिराग पासवान नितीश कुमार यांच्या सरकारला कोंडीत पकडत आहेत. मात्र आता ‘जेडीयू’कडूनही पासवान यांच्यावर टीका होऊ लागली आहे. ‘जेडीयू’चे के. सी. त्यागी यांनी आमच्या जागांचे वाटप भाजपबरोबरच होईल. तसेच ‘एलजेपी’ला भाजपकडूनच जागा मिळतील, असे स्पष्ट केले आहे. 

संबंधित बातम्या