‘भारताचे वैदिक अन्न आणि मसाले’ कार्यक्रमाचे सादरीकरण

Pib
गुरुवार, 25 जून 2020

पुढील देखो अपना देश वेबिनार 25 जून 2020 रोजी 1100 वाजता ‘इंडियन मोटरिंग एक्सपेडिशन’ (डायव्हिंग हॉलिडेज) असे आहे. नोंदणी https://bit.ly/MotoringExp यावर करता येईल.

नवी दिल्ली, 

आपल्या देशाच्या आरोग्य शास्त्राच्या प्राचीन स्वरूपाचे फलदायी फायदे दर्शविण्यासाठी देखो अपना देश वेबिनार मालिके अंतर्गत, पर्यटन मंत्रालयाने ‘वैदिक अन्न आणि मसाले’ कार्यक्रमाचे सादरीकरण केले. वेबिनार मध्ये जगासाठी अजूनही एक गूढ असलेल्या आणि आधुनिक जगाच्या पाककृतींमध्ये समविष्ट न झालेल्या वैदिक अन्न आणि मसाल्यांवर लक्ष केंद्रित करण्यात आले होते. या सत्रामध्ये काही खाद्यपदार्थांबद्दलची मिथके उलगडण्याचा आणि प्रवाशांना येथे येऊन, शोध घेऊन आणि त्याच्या मूळ चवीचा अनुभव घेण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी मसाल्याचे रहस्य आणि तो तयार करण्याच्या तंत्राचे सादरीकरण देखील करण्यात आले. देखो अपना देश वेबिनार मालिका ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ अंतर्गत भारतातील समृद्ध विविधता प्रदर्शित करण्याचा एक प्रयत्न आहे.

23 जून 2020 रोजी देखो अपना देश वेबिनार मालिकेच्या 37 व्या सत्राचे आयोजन India Food tourism.org चे संस्थापक आणि अध्यक्ष, इंडिया फूड टूर/ फूड टूर इन दिल्ली चे सहसंस्थापक आणि अध्यक्ष शेफ राजीव गोयल आणि डेम्यूरजिक हॉस्पिटॅलिटी प्रा. लि. चे व्यवस्थापकीय संचालक शेफ गौतम चौधरी यांनी केले. आपल्या शरीरातील अंतर्गत अवयवांचे कार्य सुधारण्यास सहाय्य करणारे अन्न आणि मसाल्यांच्या बाबतीत जागरुकता निर्माण करणारे आभासी सादरीकरण करून त्याचे महत्व अधोरेखित केले. 

सादरीकरण सुरु करताना शेफ राजीव गोयल म्हणाले की, वेदिक अन्न आणि मसाल्यांच्या खूप मोठा खजिना आणि साठा आपल्याकडे आहे तसेच आपल्या सर्व वेदांमध्ये आपण काय आणि कशाप्रकारे खाल्ले पाहिजे किंवा आपण आपले शरीर कशाप्रकारे तंदुरुस्त ठेवले पाहिजे हे सांगितले आहे. त्यांनी ऋग्वेद आणि यजुर्वेदातील महत्वपूर्ण अन्नविषयक ज्ञानावर प्रकाश टाकला. वैदिक साहित्याचा संदर्भ देत लोकांच्या खाण्या-पिण्याच्या सवयींवर प्रकाशझोत टाकला. शेफ गोयल यांनी समाजातील विविध घटकांद्वारे निरनिराळी पोषक तत्वे असणारे अन्न कसे खाल्ले जाते याची उदाहरणेही दिली. पॅनेलच्या सदस्याने वेदांनुसार वंगण वापरण्याच्या पद्धतीविषयी स्पष्टीकरण दिले. फोडणी करण्याचा उत्तम मार्ग म्हणजे थंड पातेल्यात तूप / लोणी टाकून आणि नंतर मिरची आणि बाकीचे मसाले घालून गॅस बंद करायचा.

पॅनेलच्या सदस्यांनी अन्न शिजवणाऱ्या भांड्यांचे महत्त्व देखील सांगितले. मातीच्या भांड्यात स्वयंपाक केल्यास पदार्थाची मूळ चव टिकून राहते त्यामुळे यावेळी मातीच्या भांड्यात स्वयंपाक करण्याचे महत्व अधोरेखित करण्यात आले. उष्णता देखील समान रीतीने पसरून ती कायम राखली जाते. तांब्याच्या भांड्यांचे औषधी गुणधर्म खूप चांगले आहेत आणि यात कोणतेही जीवाणू जिवंत राहत नाहीत. लोखंडी भाड्यांमध्ये खनिज असतात आणि यात शिजवलेले अन्न चवदार असते.

सादरकर्त्यांनी आयुर्वेदातील तीन दोषांचा (शरीर घटक) देखील उल्लेख केला, जे शरीर/मनाच्या मुख्य स्थितीचे वर्णन करतात: वात, पित्त आणि कफ. हे तिन्ही दोष सर व्यक्तींच्या शरीरात असतात, आयुर्वेदाने हे सांगितले आहे की प्रत्येक व्यक्तीकडे जन्मापासून एक प्रमुख शरीर घटक असतो आणि इतर दोघांमध्ये एक समान (जरी अनेकदा चढउतार होत असले तरी) संतुलन असते.

या सत्रामध्ये अन्न शिजवण्यासाठी वापरात येणाऱ्या भांड्यांबद्दल आणि संतुलन टिकवून ठेवण्यासाठी त्यांचा वापर कशाप्रकारे केला जावा याबद्दल महत्वपूर्ण माहिती दिली. वेगवेगळ्या धातूंनी बनवलेल्या भांड्यांच्या गुणवत्तेवरदेखील हे अवलंबून आहे जसे, चांदीच्या पात्रातील अन्न शरीर कसे थंड करते, आराम करते आणि त्यास पुनरुज्जीवित करते. तांबे आणि पितळेच्या भांड्यांत शिजवलेले अन्न रोग प्रतिकारशक्ती वाढवते आणि चयापचय क्रिया सुधारण्यास मदत करते. विड्याची पाने दोषांवर नियंत्रण ठेवण्यासही मदत करतात.

विविध खाद्यपदार्थांचे महत्व आणि त्यांचे आरोग्यविषयक फायदे देखील सामायिक करण्यात आले. फळांच्या रसापेक्षा थेट फळ खाणे कधीही उत्तम आणि मैदा जरी लवकर पचत असला तरीदेखील तो शरीरासाठी चांगला नाही आणि त्यामध्ये शून्य पोषकमुल्ये असतात. वैदिक खाद्य विज्ञानानुसार ज्या भाज्या आणि फळांमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त आहे जसे खरबूज, टरबूज, द्राक्ष, मुळा इत्यादींचा समावेश आहारात करण्याचा सल्ला दिला जातो कारण यामुळे शरीराचे तापमान संतुलित राहते, वारंवार लघवी न झाल्याने शरीराला तापमान टिकवून ठेवण्याची गरज भासत नाही.

शेफ गौतम चौधरी यांनी मुगाच्या खिचडीची पाककृती सामायिक केली आणि दर्शकांना पाहण्यासाठी आणि शिकण्यासाठी या खिचडीच्या थेट पाककृतीचे प्रात्यक्षिक आयोजित केले. त्यांनी जिरे, हळद, मिरपूड इत्यादी मसाल्यांचे महत्व सांगितले. मुगाचे महत्व देखील समजावून सांगितले. त्याचप्रमाणे दररोज स्वयंपाकात हळद वापरण्याचे फायदे सांगितले तसेच विशेषत: पाणी स्वच्छ करण्यात हळदीची क्षमता, बुरशीरोधी, जीवाणू मारक आणि रोग प्रतिकारशक्तीसाठी चांगली असल्याचे स्पष्ट केले. म्हणूनच जागतिक आकडेवारीच्या तुलनेत भारतीयांचा बरे होण्याचा वेग अधिक आहे.

देखो अपना देश वेबिनार इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने तयार केलेल्या राष्ट्रीय ई-शासन विभागाच्या (एनजीडी) संयुक्त विद्यमाने आयोजित केले जातात. देखो अपना देश वेबिनार मालिका एक भारत श्रेष्ठ भारत अंतर्गत भारतातील समृद्ध विविधता प्रदर्शित करण्याचा एक प्रयत्न आहे.

वेबिनारची सत्रे आता https://www.youtube.com/channel/UCbzIbBmMvtvH7d6Zo_ZEHDA/featured  आणि http://tourism.gov.in/dekho-apna-desh-webinar-ministry-tourism वर उपलब्ध आहेत. भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयाच्या सर्व सोशल मीडिया हँडलवर देखील वेबिनाराची सत्रे उपलब्ध आहेत.

 

संबंधित बातम्या