कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी साधला संवाद

गोमंतक वृत्तसेवा
बुधवार, 17 मार्च 2021

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि छत्तीसगढचे मुख्यमंत्री भूपेश बघेल मात्र बैठकीत उपस्थित राहू शकले नाहीत.

नवी दिल्ली: देशातील कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्य़ासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारा संवाद साधला. या बैठकीमध्ये पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि छत्तीसगढचे मुख्यमंत्री भूपेश बघेल उपस्थित राहू शकले नाहीत. तर पंतप्रधानांनी घेतलेल्या या बैठकीत कोरोनाला रोखण्यासाठी प्रेजेंटेशन देण्यात आले. देशातील 70 जिल्ह्यांमध्ये कोरोना संसर्गात 150 टक्केची वाढ झाली आहे. यामध्य़े पश्चिम भारतातील जिल्ह्यांची संख्या सर्वाधिक आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक बोलावली होती. 

महाराष्ट्रात कोरोनाच्या वाढत्या प्रादूर्भावामुळे स्थिती चिंताजनक झाली आहे. तसेच पंजाब, गुजरात, छत्तीसगढ या राज्यांमध्ये देखील कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. अशा परिस्थितीत पंजाबमध्ये आरटीपीसीआर चाचण्या वाढवणे गरजेचे बनले असल्याचे पंतप्रधान यावेळी म्हणाले. तर दुसरीकडे महाराष्ट्र, मध्यप्रदेश, राजस्थान, गुजरात या राज्यांमध्ये लसीकरण उत्तमरित्या करण्यात येत असल्याची पुस्ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जोडली. याशिवाय, सध्याच्या परिस्थितीवर आपल्याला प्रो-अ‍ॅक्टिव्ह होणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी नोंदवले. त्यानंतर, लहान कॅंटोन्मेंट झोन बनविण्याचा पर्याय आवश्यक असेल तेथे तो लागू करण्याचा सल्ला देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला. 

विमानातच महिलेने दिला बाळाला जन्म; दोघांच्या तब्येतीबाबत डॉक्टरांनी दिली माहिती

याव्यतिरिक्त, कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे लोकांना पॅनिक मोडमध्ये आणण्याची गरज नसल्याचे म्हणत, भीतीचे वातावरण पुन्हा होऊ नये याची काळजी घेण्याचे नरेंद्र मोदी यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना सांगितले. व थोडीफार खबरदारी आणि पुढाकार घेऊन आपण जनतेला त्रासातून मुक्त करावे, असे ते पुढे या बैठकीत म्हणाले. यानंतर, काही भागात कोरोनाच्या चाचण्यांमध्ये करण्यात आलेली कमी ही चिंतनाची बाब असल्याचा उल्लेख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  केला. शिवाय, गुड गव्हर्नन्ससाठी हीच योग्य वेळ असल्याचे नमूद करत, कोरोनाच्या चाचण्या वाढवण्याचे त्यांनी पुढे सांगितले. इतकेच नाही तर, आपला आत्मविश्वास हा अतिआत्मविश्वास होऊ देऊ नका, असेही नरेंद्र मोदी यांनी सांगितले.   

देशातील कोरोना रुग्णांची संख्या महाराष्ट्रामध्ये दिवसेंदिवस वाढत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्यामुळे पुन्हा महाराष्ट्र राज्यात मंगळवारी 17 हजार रुग्ण आढळून आले आहेत. तर दुसरीकडे देशातील कोरोना पिडितांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. इतर राज्यांमध्येही कोरोनाचा आकडा वाढू लागला आहे. पंजाब, गुजरात, कर्नाटक, तामिळनाडू या राज्यांमध्ये कोविड रुग्णांची संख्य़ा मोठ्या प्रमाणात वाढू लागली आहे. मागील 24 तासामध्ये 79.73 टक्के इतकी कोरोनाची सकारात्मक प्रकरणे दिसून आली आहेत. कोरोनाचा वाढता संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी गुजरात सरकारने मंगळवारी चार मोठ्या शहरांमध्ये संचारबंदीच्या कालावधीत आणखी दोन तासांची वाढ करण्याचा निर्णय घेतला. हे निर्बंध 31 मार्चपर्यंत लागू राहणार असल्याचे गुजरात सरकारने म्हटले आहे. 

संबंधित बातम्या