मोदी यांचा ‘लोकल फॉर दिवाळी’चा मंत्र

गोमंतक वृत्तसेवा
मंगळवार, 10 नोव्हेंबर 2020

दिवाळीत स्‍थानिक (स्वदेशी) उत्पादने खरेदी करून अर्थव्यवस्थेला उभारी देण्याचे आवाहन करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘लोकल फॉर दिवाळी’चा मंत्र आज दिला.

नवी दिल्ली : दिवाळीत स्‍थानिक (स्वदेशी) उत्पादने खरेदी करून अर्थव्यवस्थेला उभारी देण्याचे आवाहन करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘लोकल फॉर दिवाळी’चा मंत्र आज दिला.

मोदी यांनी त्यांचा मतदारसंघ असलेल्या वाराणसीला दिवाळीच्या भेटीच्या रूपात ६०० कोटी रुपयांपेक्षा जास्त निधीच्या ३० विकास योजनांचे उद्‍घाटन व भूमिपूजन सोमवारी केले. व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आयोजित केलेल्या कार्यक्रमात पंतप्रधानांनी योजनेच्या लाभार्थींशीही संवाद साधला. कार्यक्रमात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हेही लखनौहून सहभागी झाले होते. मोदी यांनी काशीतील दशाश्‍वमेध घाट आणि खिडकिया घाटांचे सुशोभीकरण, सारनाथमधील ध्वनी व प्रकाश कार्यक्रम अशा विविध योजनांचे उद्‍घाटन व भूमिपूजन केले.  मोदी म्हणाले, ‘‘आजकाल ‘लोकलसाठी व्होकल’बरोबरच ‘लोकल फॉर दिवाळी’ या मंत्राची धून ऐकू येत आहे. सणांच्या काळात स्वदेशी उत्पादने खरेदी करा, असे आवाहन करतो’’

‘सर्वच गोष्टी स्वदेशी घ्याव्यात’
स्थानिक वस्तू घेण्याचे आवाहन करताना मोदी म्हणाले की, ‘लोकल’साठी ‘व्होकल’ बनण्याचा अर्थ केवळ दिवे खरेदी करणे नाही तर, प्रत्येक वस्तू खरेदी करावी. ज्या वस्तू आपल्या देशात तयार होणे अशक्य आहे, बाहेरूनच घ्याव्या लागत असतील तर बाब वेगळी आहे. अशा गोष्टी गंगेत सोडाव्यात, असे मी बिलकूल सांगणार नाही.  वाराणसीतील विकासकामांचा उल्लेख मोदी यांनी 
भाषणात केला.  

‘यूपी’तील स्थानिक वस्तू भेट द्या!
पंतप्रधानांच्या स्वदेशी वस्तू खरेदी करण्याच्या आवाहनानंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ‘Local4Diwali’ या हॅशटॅगसह दिवाळीला स्वदेशी रंगांच्या प्रकाशाने उज्ज्वल करण्याचा सल्ला ट्विटरवरुन दिला. दिवाळीत उत्तर प्रदेशमध्ये तयार केलेल्या वस्तूंची भेट देण्याचे आवाहन राज्यातील नागरिकांना केले. गोरखपूरमधील टेराकोटास बनारसमधील रेशमी साड्या आणि लखनौच्या चिकनकारीने सजलेल्या वस्तूंचा उल्लेख त्यांनी केला.

 

संबंधित बातम्या