पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कमला हॅरिस यांची भेट, पाकिस्तानसह या मुद्द्यांवर चर्चा

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) सध्या अमेरिकेच्या (USA) दौऱ्यावर आहेत या दौऱ्यादरम्यान ते अनेक जागतिक नेत्यांना भेटणार आहेत.
Prime Minister Narendra Modi & US Vice President Kamala Harris meeting
Prime Minister Narendra Modi & US Vice President Kamala Harris meetingTwitter @ANI

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) सध्या अमेरिकेच्या (USA) दौऱ्यावर आहेत या दौऱ्यादरम्यान ते अनेक जागतिक नेत्यांना भेटणार आहेत. दरम्यान याचाच एक भाग म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस (US Vice President Kamala Harris) यांची व्हाईट हाऊस (White House) येथे भेट घेतली आणि दोन्ही देशांमधील संबंधांचे कौतुक केले आहे. या बैठकीदरम्यान पंतप्रधान मोदींनी विश्वास व्यक्त केला की अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन आणि उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांच्या नेतृत्वाखाली द्विपक्षीय संबंध नवीन उंचीवर पोहोचतील. (Prime Minister Narendra Modi & US Vice President Kamala Harris meeting)

परराष्ट्र सचिव हर्षवर्धन शृंगला यांनी दोन्ही राजकारण्यांच्या भेटीसंदर्भात एक निवेदन जारी केले आणि म्हटले की, पंतप्रधान मोदी यांनी प्रथमच अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांची भेट घेतली आहे. दोन्ही नेत्यांनी अलीकडील जागतिक आणि प्रादेशिक घडामोडींवर चर्चा केली. कोविड आणि लसीकरण हा त्यांच्या चर्चेचा मुख्य भाग होता. शृंगला पुढे म्हणाले की, दोन्ही देशांनी भविष्यात अंतराळ सहकार्य, माहिती तंत्रज्ञान, उदयोन्मुख आणि गंभीर तंत्रज्ञान, आरोग्य क्षेत्रात एकत्र काम करण्यावर चर्चा केली आहे.

पाकिस्तानच्या मुद्यावरही चर्चा

यासह, परराष्ट्र सचिव म्हणाले की, अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांनी सीमापार दहशतवादासंदर्भात पंतप्रधान मोदींशी सहमती दर्शविली आहे. भारत अनेक दशकांपासून दहशतवादाचा बळी आहे. त्याचबरोबर हॅरिस यांनी पाकिस्तानच्या पाठिंब्यावर उभे असलेल्या दहशतवादी गटांवर बारीक लक्ष ठेवण्याच्या गरजेवरही सहमती दर्शविली आहे. कमला हॅरिस यांनी दहशतवादावर पाकिस्तानच्या भूमिकेचा उल्लेख करत पाकिस्तानात दहशतवादी गट कार्यरत आहेत याच गटांनी अमेरिकेच्या सुरक्षा आणि भारतावर परिणाम होऊ नये म्हणून त्यांनी पाकिस्तानला या संदर्भात कारवाई करण्यास सांगितले आहे.

पंतप्रधान मोदींनी मानले अमेरिकेचे आभार

या बैठकीदरम्यान, पीएम मोदी म्हणाले की, जगातील सर्वात मोठी आणि सर्वात जुनी लोकशाही म्हणून भारत आणि अमेरिका नैसर्गिक भागीदार आहेत. आपल्या मूल्यांमध्ये समानता आहे. आमचा समन्वय आणि सहकार्य देखील सातत्याने वाढत आहे. पीएम मोदी म्हणाले की जेव्हा भारत कोविड -१९ च्या दुसऱ्या लाटेच्या पकडीत होता, तेव्हा भारताला मदत केल्याबद्दल मी अमेरिकेचे आभार मानतो.पीएम मोदी म्हणाले की कोविडच्या वेळी अमेरिकेने खऱ्या मित्राप्रमाणे मदत केली. तसेच ते म्हणाले की त्यावेळी अमेरिकन सरकार, कंपन्या आणि भारतीय समुदाय सर्व मिळून भारताला मदत करण्यासाठी एकत्र आले.

कमला हॅरिस यांना भारत भेटीचे आमंत्रण

पंतप्रधान मोदींनी उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांना भारत भेटीचे आमंत्रण दिले आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले की, तुमची विजयाची यात्रा ऐतिहासिक आहे. भारतातील जनतेला भारतातील या ऐतिहासिक विजय प्रवासाचा सन्मान, स्वागत करणे आवडेल, म्हणून मी तुम्हाला भारतात येण्याचे खास आमंत्रण देतो.त्याचबरोबर त्यांचे कौतुक करताना पंतप्रधानांनी तुम्ही जगातील अनेक लोकांसाठी प्रेरणास्थान आहात असे सांगितले आहे.

Prime Minister Narendra Modi & US Vice President Kamala Harris meeting
UNGA मध्ये बायडन यांचा भारताला पाठिंबा, तर पाकिस्तानला खडेबोल

भारत हा अमेरिकेचा अत्यंत महत्वाचा भागीदार - कमला हॅरिस

कमला हॅरिस म्हणाल्या की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वॉशिंग्टन डीसीमध्ये स्वागत करणे माझ्यासाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे. त्यांनी असेही म्हटले आहे की इतिहास साक्षी आहे की जेव्हा जेव्हा आम्ही दोन्ही देश एकमेकांच्या बाजूने उभे राहिलो, तेव्हा दोन्ही देशांनी स्वतःला अधिक सुरक्षित, मजबूत आणि समृद्ध मानले आहे. कमला हॅरिसने भारताला अमेरिकेचा "अत्यंत महत्वाचा भागीदार" म्हटले. तसेच नवी दिल्लीच्या घोषणेचे स्वागत केले आहे, ज्यामध्ये भारताने कोविड -19 लसीची निर्यात पुन्हा सुरू करण्याविषयी बोलले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com